डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ नुकताच संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून होली एंजल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना रोड्रिक्स शिंदे, संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके, कोषाध्यक्ष अमित भावे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे अर्चना रोड्रिक्स शिंदे म्हणाल्या, ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला खूप परीक्षा द्यायच्या आहेत. तीन गोष्टींना विसरू नका. शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र आहे, आपणात नम्रपणा ठेवा. तसेच स्वयंशिस्त ही महत्वाची आहे. याचबरोबर सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यावर भर द्यावा. संस्कार हे शाळा शिकवते. ज्ञान देणाऱ्या गुरूंना कधीही विसरू नये. शाळेशी बांधील रहा व शाळेचे नाव कायम पुढे ठेवा. तर संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी असेच उतामोत्तम गुण मिळवावेत, यापुढील जीवन हे स्पर्धेचे युग आहे. यात तुम्हाला अभ्यास वाढवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी यापुढे जीवनाच्या अथांगसागरात स्वावलंबन, परिश्रम, स्वकष्ट आणि सिंहावलोकान करावे. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आहे.
यावेळी पूर्व उच्च प्राथमिक 5 वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पाचवी मधून शिष्यवृत्ती प्राप्त सात विद्यार्थी, आठवी मधील शिष्यवृत्ती प्राप्त दोन विद्यार्थी, दहावी मधील तेवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता.प्राथमिक शिष्यवृत्ती प्राप्त तनिष्क हेमंत हर्डीकर, माध्यमिक मधील स्वरा निखिल वालावलकर तर दहावी मधून संस्थेच्या सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी तन्वी विलास झाड यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सूत्रंचलनाची जबाबदारी स्वप्नाली दळवी यांनी सांभाळली.यावेळी संस्था सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.














Leave a Reply