“गुरुजीचा फोन” लघुपटाचे प्रदर्शन

गुरुजीचा फोन” म्हणजे वाड्या पाड्या वस्तीवरील सरकारी शाळांमधील सत्य घटना – संजय अस्वले

कल्याण : कुणाल म्हात्रे 

शिक्षकाच्या एका फोन, मेसेजवर विद्यार्थी शाळेत येतात. अजय पाटील दिग्दर्शित “गुरुजीचा फोन” हा लघुपट सर्वार्थाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रतिनिधित्व करत आहे. ठाकराचा पाडा शाळेतील मुलांनी केलेला अभिनय पाहून मी थक्क झालो. असे उद्गार लघुपट उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती भिवंडीचे गटशिक्षण अधिकारी संजय अस्वले यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख शरद जाधव, ग्रामपंचायत सदस्या दिव्या ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृंदा ठाकूर, अंगणवाडी मदतनीस बनुबाई ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली कानकेकर, पालक उपस्थित होते.

यावेळी अजय पाटील यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी विद्यार्थांच्या विविध स्पर्धांमध्ये ठाकराचापाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम बालनाट्य सादर केले होते. तेव्हाच मला या विद्यार्थ्यांच्या अभिनयाची चमक दिसून आली होती. आणि ह्या मुलांना घेऊन एक दिवस मी लघुपट बनवेन असा निर्धार केला होता. तो आज पूर्णत्वास जात आहे.

“गुरूजीचा फोन” हा लघुपट म्हणजे मुलांच्या आनंदाचा क्षण. संधी मिळाली तर हम भी कुछ कम नही । हेच दाखवून देत आहे, असे केंद्र प्रमुख शरद जाधव म्हणाले. लघुपट्याची कथा करण राजपूत यांची असून, पटकथा -संवाद आणि दिग्दर्शन अजय पाटील यांनी केलेले आहे. कॅमेरा आदर्श पाटील, एडिटिंग आकाश पाटील, संगीत अनिश पुजारी यांचे आहे.

ग्राम ग्रामपंचायत सदस्य दिव्या ठाकूर यांनी सांगितलं की, हा लघुपट म्हणजे आम्हा गावकऱ्यांसाठी आणि शाळेसाठी अभिमानाचा क्षण आहे. आमची शाळा आमचं गाव, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दिसणार आहे. म्हणून मला आज प्रचंड आनंद झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली कानकेकर यांनी अजय पाटील यांना धन्यवाद देऊन आमच्या मुलांना टीव्हीवर आणल्याचा आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास पाटकर यांनी केले. हा व्हिडिओ युट्युबवर अतिशय चांगला प्रतिसाद मिळवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *