घरगुती गॅससाठी टिटवाळ्यात नागरिकांची झुंबड; उपलब्धतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

टिटवाळा : केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडर सहज उपलब्ध असल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र त्यासाठी मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र टिटवाळा परिसरात समोर आले आहे. आज टिटवाळ्यातील गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले असून, सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.सकाळच्या पहाटेपासूनच अनेक नागरिक गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती या रांगांमध्ये पाहायला मिळाली. घरगुती कामकाज आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांना अशा प्रकारे तासन्तास उभे राहावे लागत असल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर वितरणात अनियमितता जाणवत असून, अनेक वेळा एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध नसतो. परिणामी सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सहज उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना टिटवाळ्यात दिसून आलेल्या या परिस्थितीमुळे त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात नागरिकांना गॅससाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने शासनाच्या यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित आणि सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात ही समस्या अधिक तीव्र होण्याची भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *