डोंबिवलीत ‘जोडीने चालूया’ उपक्रम रंगणार; डॉ. संदीप व प्रा. मंजिरी घरत यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा

डोंबिवली : संदीप वैद्य 

शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे डोंबिवलीकर दांपत्य डॉ. संदीप घरत आणि प्रा. मंजिरी घरत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रसिकांसमोर उलगडणार आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने आयोजित ‘जोडीने चालूया’ या विशेष मुलाखत मालिकेत त्यांच्या यशस्वी वाटचालीतील अनुभव, संघर्ष आणि मूल्यांची मांडणी होणार असून, हा कार्यक्रम शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डोंबिवली पूर्व येथील वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर परिसरात संपन्न होणार आहे.

अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण करूनही देशात परत येत आपल्या कार्याने समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दांपत्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या यशामागील विचारसरणी, निर्णयप्रक्रिया आणि सामाजिक बांधिलकी यांचा वेध लेखक व कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चाधिकारी माधव जोशी हे संवादातून घेणार आहेत. ‘जोडीने चालूया’ या संकल्पनेतून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधत एकत्र यश कसे मिळवता येते, याचे वास्तव उदाहरण या मुलाखतीतून समोर येणार आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचाही गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रीकला संस्कार न्यास तसेच राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुरुकुल द डे स्कूलच्या संघांचा सत्कार सोहळाही यावेळी रंगणार आहे. ज्ञान, प्रेरणा आणि सांस्कृतिक अभिमान यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *