डोंबिवली (शंकर जाधव) : डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणारा आणि महिलांच्या सर्जनशीलतेचा भव्य उत्सव ठरणारा ‘वुमेन्स आर्ट फेअर – आर्ट फॉर चॅरिटी’ हा उपक्रम यंदा प्रथमच रंगणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी छंद म्हणून जोपासलेल्या उत्कृष्ट कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, तसेच त्या कलेतून सामाजिक कार्यालाही हातभार लागावा या दुहेरी उद्देशाने दीपकला फाऊंडेशन आणि डोंबिवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
२० ते २२ मार्च या कालावधीत डोंबिवलीतील प्रसिद्ध आनंद बालभवन येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून गुढी पाडवा आणि महिला दिनाचे औचित्य साधत सांस्कृतिक नगरीत प्रथमच अशा स्वरूपाचा कलेचा उत्सव साकारत आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, रेझिन आर्ट, मंडला, मधुबनी, सिरेमिक, मोजेक, पारंपरिक कला आणि हस्तकला अशा विविध प्रकारच्या कलाकृतींचा देखणा मेळ पाहायला मिळणार असून ‘कलेचा अनोखा संगम’ ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

विशेष म्हणजे, डॉक्टर, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्ससह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या तब्बल ४० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून त्यांच्या सर्जनशीलतेची झलक या प्रदर्शनातून उलगडणार आहे. छंदातून जोपासलेली कला समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केवळ कलात्मकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीची जाणीवही दृढ करणार आहे.
या प्रदर्शनात कलारसिकांकडून स्वेच्छेने जमा होणारी रक्कम दीपकला फाऊंडेशनमार्फत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले असून डोंबिवलीकरांसाठी ही एक आगळीवेगळी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.















Leave a Reply