प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेंच्या सुरावटीत रमले रसिक डोंबिवलीकर

डोंबिवली : संदीप वैद्य 

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या “द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह” या हिंदी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीच्या सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुलात डोंबिवलीतील श्रीखंडेवाडीतील प्रतिष्ठित गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तरुण मित्र मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केले होते. वर्ल्ड कप फायनल असूनही मैफिलीला उपस्थित असलेल्या दिड ते दोन हजार रसिक डोंबिवलीकरांच्या उस्फुर्त प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीची सुरुवात
तुज मागतो मी आता या गाण्याने झाली.

त्यानंतर तरुण आहे रात्र अजूनी, पानी पानी रे, हिरे मोती मै ना जानू , हम बेवफा, ओ रंग रे अपने ही रंगमे मुझको रंग दे ,मोगरा फुलला,बगळ्यांची माळ फुले ,लक्ष्मी वल्लभा दीनानाथा अश्या एका पेक्षा एक अप्रतिम गाण्यांनी मैफल रंगत गेली आणि या रंगलेल्या मैफलीची सांगता कानडा राजा पंढरीचा या अभंगाने, विठ्ठल नामाच्या गजराने झाली .

या मैफिलीत साथसंगत करण्यासाठी तबल्यावर निखिल फाटक , हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी, किबोर्ड विशाल धुमाळ, बासरीवर वरद कठापूरकर, गिटारवर रितेश ओवाळ आणि पर्कशन्सवर ओंकार इंगवले असे एकापेक्षा एक दिग्गज वादक होते. राहुलजींच्या एका पेक्षा एक सरस पेश केलेल्या गाण्यांना अप्रतिम साथसंगत करताना त्यांच्या जुगलबंदी ही रसिक डोंबिवलीकरांना आनंद देऊन गेली.

मैफलीच्या शेवटी राहुल देशपांडे यांनी वर्ल्डकप फायनल सुरू असतानाही येवढ्या मोठ्या संख्येने रसिक डोंबिवलीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल डोंबिवलीकरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोसले आणि जेष्ठ सभासद आणि मार्गदर्शक अविनाश वसंत देव यांनी राहुलजी देशपांडे व सर्व वादक कलाकारांचा सत्कार केला तर मंडळ स्थापने पासून मंडळात कार्यरत असणारे मंडळाचे मार्गदर्शक अनिल गजानन माळी यांनी मंडळाच्या आज पर्यंतच्या कार्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *