गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना आरोग्यसेवेची सुवर्णसंधी; आमदार किसन कथोरे करणार उद्घाटन
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात २५ मार्च रोजी तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबीरात विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या शिबीरातून नागरिकांना आरोग्य तपासणी व सल्ला मोफत मिळणार आहे. स्त्रीरोग, हृदयरोग, त्वचारोग, कॅन्सर तपासणी, दंतरोग, बालरोग, नेत्रविकार, अस्थिरोग, मॅमोग्राफी, पोटाचे विकार, मानसिक आरोग्य, रक्तदाब आणि मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, डॉ. स्वाती शिंदे तसेच गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दहागांवच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिबीराच्या नियोजनात पुढाकार घेतला आहे.
सुमारे ५०० हून अधिक नागरिक या शिबीराचा लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोंडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कांबळे (पत्रकार व सदस्य, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान) यांनी सहकार्य केले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














Leave a Reply