आगरी कोळी चषक 2026 उत्साहात संपन्न; ४०+ खेळाडूंनी दाखवली जिद्द आणि एकजूट

भांडुपमध्ये २१ संघांची रंगतदार स्पर्धा; विविध गावांतील संघांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई, प्रतिनिधी : आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई, ठाणे, पालघर विभाग) यांच्या वतीने आयोजित ‘आगरी कोळी चषक 2026’ ही चाळीस वर्षांवरील खेळाडूंसाठीची विशेष स्पर्धा भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा परिसरातील आदर्श क्रीडांगणावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील तब्बल २१ गावांतील संघांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश ४० वर्षांवरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभाव जपणे तसेच आगरी कोळी समाजात एकजूट निर्माण करणे हा होता. खेळाडूंनी आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर मैदानावर उत्कृष्ट खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे —
प्रथम पारितोषिक ‘आई गावदेवी ४०+ मास्टर, भांडुप’ संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक ‘चिखलादेवी मास्टर, कोपरी ठाणे’ संघाला मिळाले. तृतीय पारितोषिक ‘श्री पोषमात्रा, भाईंदरपाडा मास्टर’ तसेच ‘शेंडोबा, कासारवडवली बी’ संघांनी संयुक्तपणे मिळवले. चतुर्थ पारितोषिक ‘श्रीराम, बिलालपाडा मास्टर’ आणि ‘श्री दत्तगुरु, नवघर मास्टर ए’ या संघांना देण्यात आले.

स्पर्धेदरम्यान विविध सर्वपक्षीय नेते, समाजातील मान्यवर, मंडळाला सहकार्य करणारे दानशूर व्यक्ती तसेच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे आगरी कोळी समाजात एकात्मता आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *