कल्याण : कुणाल म्हात्रे
मानवसेवेप्रति असलेल्या आपल्या दृढ बांधिलकीची पुनःप्रचिती देत संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी नाना चौक, ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकर शेठ म्युनिसिपल स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कुंभारवाडा आणि परिसरातील निरंकारी भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या बॅनरखाली हे शिबिर पार पडले. संत निरंकारी ब्लड बँक, विले पार्ले (१२३ युनिट्स) आणि कामा हॉस्पिटल ब्लड बँक (५८ युनिट्स) यांनी मिळून एकूण १८१ युनिट रक्त संकलित केले.
शिबिराचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक संतोष ढाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निरंकार परमात्माच्या प्रार्थनेने झाली. या प्रसंगी डॉ. विशाल हार्डे (कामा हॉस्पिटल), नगरसेवक गौरांग झवेरी, सनी सानप, अजय पाटील, स्नेहल तेंडुलकर आणि राजश्री भातणकर यांसारख्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. ए.पी.आय. नागू उगले आणि ए.पी.आय. प्रणाली जगताप यांनीही या शिबिराला सदिच्छा भेट दिली. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक हकीम सिंह यांच्यासह अनेक प्रबंधक व सेवादल अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मिशनच्या मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी आणि विश्वबंधुत्वाच्या भावनेला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
स्थानिक मुखी विनोद थापनिया यांच्या देखरेखीखाली सेवादल स्वयंसेवक तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी हे शिविर यशस्वी केले. अशा मानवतावादी उपक्रमांद्वारे संत निरंकारी मिशन हा संदेश देत आहे की रक्तदान ही केवळ जबाबदारी नसून निस्वार्थ भक्तीची अशी अभिव्यक्ती आहे जी अनेकांचे प्राण वाचवू शकते.
















Leave a Reply