उन्हाच्या झळांत तहानलेले पक्षी; टिटवाळ्यात जनताहित फाउंडेशन ट्रस्टकडून पाण्याच्या कुंड्यांचे मोफत वितरण

टिटवाळ्यात जनताहित फाउंडेशन ट्रस्टकडून पक्ष्यांसाठी पाण्याच्या मातीच्या कुंड्यांचे वितरण

टिटवाळा : प्रतिनिधी

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना कडक उन्हामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही पाण्याची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारी झाडांची तोड आणि कमी होत चाललेले नैसर्गिक पाणवठे यामुळे अनेक पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले असून चिमण्या, कावळे, कबुतरे, मैना यांसारखे पक्षी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जनताहित फाउंडेशन ट्रस्टने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून पक्ष्यांसाठी मातीच्या पाण्याच्या कुंड्यांचे (पॉट) निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, खिडकीत, बाल्कनीत किंवा परिसरातील झाडांजवळ पाण्याची कुंडी ठेवून पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, तसेच दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळून प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारावी, असेही संस्थेने नमूद केले आहे.

याबाबत बोलताना जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे म्हणाले, “माणूस मागून पाणी पिऊ शकतो, पण पक्ष्यांचे काय? पक्षी आपली गरज व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या साठी पाण्याची सोय करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून अनेक पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात.”

दरम्यान, या उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी मातीचे पाण्याचे पॉट निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६९७९२४०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाच्या झळांत तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची एक कुंडी ठेवण्याचा साधा पण माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *