फेरफार प्रकरणातील कागदपत्रांसाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसम रंगेहाथ पकडला ; ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील तलाठी कार्यालयाशी संबंधित फेरफार प्रकरणातील कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी इसमाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल कार्यालयाशी संबंधित व्यवहारांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४८ वर्षीय नागरिक असून ते पेशाने वकील आहेत . त्यांना त्यांच्या अशीलाच्या जमिनीशी संबंधित फेरफार नोंदी व त्यासंबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवायच्या होत्या जमिनीशी संबंधित वाद प्रलंबित असल्याने तक्रारदारांनी संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जानुसार संबंधित फेरफार नोंदी व त्यासंबंधित संपूर्ण कागदपत्र संचाची प्रत आवश्यक होती. अर्जानंतर माहिती घेण्यासाठी ते तहसील कार्यालयात गेले असता, त्यांना संबंधित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी अंबिवली येथील तलाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यानंतर तक्रारदार त्यांच्या अशिलासह अंबिवली येथील तलाठी कार्यालयात गेले असता तेथील कामकाजाशी संबंधित असलेला खासगी इसम निलेश पवार याच्याशी त्यांचा संपर्क झाला. मात्र संबंधित फेरफार नोंदी जुन्या असल्याचे कारण देत कागदपत्रे शोधण्यासाठी वेळ लागेल असे सांगून त्याने वारंवार टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढे याच प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांच्या प्रती मिळवून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील तलाठी कार्यालयात कागदपात्रांच्या प्रती घेण्यासाठी गेले असताना त्या वेळी तलाठी कार्यालयाशी संबंधित काम पाहणारा खासगी इसम निलेश पवार (वय ३५) याने कागदपत्रांच्या प्रती मिळवून देण्यासाठी सुरुवातीला ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चर्चा झाल्यानंतर ही रक्कम ५ हजार रुपयांवर ठरवण्यात आली.

या प्रकाराबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ : २५ मि. आंबिवली येथील तलाठी कार्यालयात आरोपी निलेश पवार याने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली, त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान आवश्यक पंचनामा करण्यात आला असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सापळा कारवाईचे मार्गदर्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. दरम्यान, सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *