शैक्षणिक, कला-क्रीडा व तंत्रज्ञानातील विद्यालयाच्या प्रगतीचे मान्यवरांकडून कौतुक
चंद्रकांत देसले /शहापूर
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोळखांब येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि १ सप्टेंबर रोजी उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. याचवेळी ज्येष्ठ समाजसेवक जगे काका यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज डायनिंग हॉलचेही उद्घाटन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार, रायगड विभागाचे चेअरमन तथा माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी जगताप तसेच ज्येष्ठ समाजसेवक जगे काका यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रयतगीत व स्वागतगीताने वातावरण संगीतमय झाले. काही दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सभागृहाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. त्यांनी दूरध्वनीद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. डोळखांबसारख्या दुर्गम भागात असूनही विद्यालयाचा झालेला विकास आणि सुंदर परिसर पाहून मन भारावून गेल्याचे सहसचिव बी. एन. पवार यांनी सांगितले. विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता तसेच कला, क्रीडा व संगीत क्षेत्रातील यश कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे बाळाराम पाटील यांनी नमूद केले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांनी विद्यालयाचा विकास टप्प्याटप्प्याने होताना आपण स्वतः साक्षीदार असल्याचे सांगत विद्यालयाच्या प्रगतीचा सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार विभागीय समन्वय समितीचे सदस्य व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन विकासभाई चौधरी, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य व कृ. उ. बा. स.चे सभापती नंदकुमार डोहळे, ज्येष्ठ सदस्य रामचंद्र फर्डे आणि मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत अधिकारी, विविध समित्यांचे सदस्य, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जगदीश विशे यांनी केले.













Leave a Reply