नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

शहापूर तालुक्यातील वनविभागाची मोठी कारवाई; ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निश्वास

चंद्रकांत देसले / शहापूर

शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीचे सावट निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. कळभोन्डे परिसरातील आठ वर्षीय कु. कृष्णा भागा अगीवले हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. अखेर वनविभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेला यश मिळत संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

घटनेनंतर वनविभागाने तातडीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. तसेच ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जंगल परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात होती. स्थानिक गस्ती पथक आणि रॅपिड रेस्क्यू टीमने दिवस-रात्र गस्त घालत बिबट्याचा माग काढण्याचे काम सुरू ठेवले होते.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कळभोन्डे परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात संबंधित बिबट्या अडकल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बालिकेवर हल्ला झाला होता, त्या ठिकाणापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरच हा बिबट्या पकडण्यात आला. त्यामुळे वनविभागाचा संशय अखेर खरा ठरला.

वनअधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण कारवाई पूर्ण केली. पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

या यशस्वी कारवाईनंतर कळभोन्डे आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वनविभागाच्या तत्परतेचे आणि धाडसी प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पुढील काळातही अधिक सतर्क राहून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही संपूर्ण मोहीम उपवनसंरक्षक शहापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, रेस्क्यू टीम, वन कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *