ठाण्यातील कोळशेत परिसरातील धक्कादायक प्रकार; कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे, वार्ताहर : किरकोळ कारणावरून संतापाच्या भरात शेजाऱ्याने अवघ्या नऊ वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कोळशेत परिसरात उघडकीस आली आहे. मुलाने ‘टकला अंकल’ असे संबोधल्याचा राग मनात धरून आरोपीने त्याला मारहाण केल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळशेत परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील नऊ वर्षांचा मुलगा परिसरात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या रोकेश (वय २३) यांच्या समोरून गेला. त्या वेळी मुलाने सहजपणे ‘टकला अंकल’ असे संबोधल्याचे सांगितले जाते. या संबोधनाचा आरोपीला राग आल्याने त्याने संतापाच्या भरात मुलाला पकडून त्याच्यावर हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगा घाबरून गेला.
मारहाण झाल्यानंतर मुलगा रडतच घरी परतला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर मुलाच्या आईने तातडीने शेजाऱ्याकडे जाऊन जाब विचारला असता आरोपीने उलट वाद घालत शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत मुलाच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.














Leave a Reply