पाथहोल बुजवायला गेले अन् त्याचेच केले खड्ड्यात रूपांतर!पाथहोल बुजवायला गेले अन् त्याचेच केले खड्ड्यात रूपांतर!
टिटवाळा : अजय शेलार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून रस्त्यावरील पाथहोल बुजविण्यासाठी करण्यात आलेल्या डागडुजीच्या कामाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. पाथहोल बुजविण्याऐवजी त्याच्या आजूबाजूला डांबर टाकून मूळ खड्ड्याचे रूपांतर आणखी मोठ्या आणि धोकादायक खड्ड्यात करण्यात आल्याने महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणी कालच डागडुजी करण्यात आली काही हौशी मंडळींनी तर सोशाल मिडीयावर इथे उभे राहून फोटोसेशन करत आपल्या अथक प्रयत्नांतूनच हे काम झाले असल्याचा दणका देखील वाजवला मात्र दुसऱ्याच दिवशी या कामाची दयनीय अवस्था समोर आली आहे. हा प्रकार आहे टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिर मुख्य रस्त्यालगत असलेल्या निमकर नाका स्वामी विवेकानंद चौक येथील .
पाथहोलच्या आतील भागाची योग्य पद्धतीने दुरुस्ती करून रस्ता समतल करण्याऐवजी केवळ आजूबाजूच्या भागात डांबर टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आधीच असलेला पाथहोल अधिक रुंद आणि धोकादायक बनला असून या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने डागडुजी केली की खड्डा बुजविला, असा प्रश्न उपस्थित होण्याऐवजी आता “खड्डा मोठा करण्याचे काम केले का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पाथहोल बुजविण्यासाठी महापालिकेचा रस्ते विभाग डागडुजी करतो की पाथहोलचेच रूपांतर खड्ड्यात करण्यासाठी काम करतो? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रस्ते विभागाने दुचाकीस्वारांची सुपारी घेतली आहे का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यांच्या डागडुजी आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात केलेल्या कामाचा दर्जा काय आहे, याची पाहणी केली जाते का, असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम करून घेतल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कोणाची? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करतात का? की कागदोपत्री काम पूर्ण दाखवून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे? असे सवालही मनसेकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
पाथहोलची डागडुजी करताना संबंधित भाग व्यवस्थित कट करून खराब झालेला थर काढणे, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे, योग्य पद्धतीने डांबर टाकणे आणि रस्ता समतल करणे अपेक्षित असते. मात्र संबंधित ठिकाणी या प्रक्रियेला फाटा देत केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. अशा निकृष्ट पद्धतीच्या डागडुजीमुळे पावसाचे पाणी साचून रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी हा खड्डा दुचाकीस्वारांच्या लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे खड्डेमुक्त रस्त्यांची आश्वासने आणि दुसरीकडे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली खड्डे अधिक धोकादायक करण्याचा प्रकार, अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या रस्त्यांच्या कामात केवळ औपचारिकता न करता दर्जेदार आणि शास्त्रोक्त पद्धतीने काम होणे गरजेचे असल्याचे ॲड. शिळकंदे यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी, निकृष्ट डागडुजीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच पाथहोलची शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या डागडुजीच्या कामात अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि कामचलाऊपणा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे,” असा इशारा ॲड. अविनाश शिळकंदे यांनी दिला आहे.













Leave a Reply