नाल्याचे पाणी रस्त्यावर, थेट घर-दुकानात; पालिका करदाते मंगेश कचरे यांचे मोठे नुकसान!

इंदिरा नगर, नांदप रोड येथील प्रकार; मनसेकडून प्रत्यक्ष पाहणी, प्रशासनाला जन आंदोलनाचा इशारा

टिटवाळा : अजय शेलार 

मांडा–टिटवाळा पूर्वेकडील नांदप रोडवरील इंदिरा नगर, एकवीरा चाळ, रूम नं. १ परिसरात नाल्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान टाकण्यात आलेल्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडवला गेल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून पुढे थेट घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे.

परिसरातील दुकान व घरमालक मंगेश कचरे यांच्या घरात व दुकानात नाल्याचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाल्याचे घाण पाणी दुकानात आणि घरात शिरल्याने साहित्याचे नुकसान होण्याबरोबरच दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे आणि श्री. दिलीप राठोड यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नाल्याचे पाणी रस्त्यावर कशाप्रकारे येत आहे आणि त्याचा नागरिकांच्या घर-दुकानांवर कसा परिणाम होत आहे, याची पाहणी करण्यात आली. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. रस्त्याच्या कामामुळे नाल्याचा प्रवाह अडत असेल तर तो तातडीने पूर्ववत करून नाल्याचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही आणि नागरिकांना नाल्याच्या पाण्यापासून दिलासा मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ॲड. अविनाश शिळकंदे व श्री. दिलीप राठोड यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. नागरिकांच्या घरात आणि दुकानात नाल्याचे पाणी शिरत असताना प्रशासन आणखी किती वेळ शांत बसणार? रस्ता विकासाच्या नावाखाली नागरिकांना नाल्याच्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ येणार असेल, तर संबंधित कामाचे नियोजन आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. इंदिरा नगर परिसरातील नाल्याचा प्रवाह तातडीने मोकळा करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *