मागील विसर्जनातील वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांची विशेष खबरदारी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नोटिसा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळ्यात नुकत्यात दोन गटात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विसर्जनासाठी कल्याण तालुका पोलीस स्टेशनकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पडाव्यात, यासाठी टिटवाळा पूर्व आणि पश्चिम परिसरातील तसेच मांडा परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होईल अशा कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मिरवणूक शांततेत पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या साथीनेच पार पाडाव्यात, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या आवाजात डीजे वाजवणे, ध्वनिप्रदूषण करणे, मिरवणुकीत वाद निर्माण होईल असे कृत्य करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण करणे टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.२० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी टिटवाळा परिसरात मिरवणुकीच्या मार्गावरून तसेच अन्य कारणांवरून काही व्यक्तींमध्ये मध्यरात्री वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यवसान शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत झाले होते. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि विसर्जनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी यंदा सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.पोलिसांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, इतर मंडळांच्या मिरवणुकीला अडथळा निर्माण करू नये, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने गर्दी करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यंदाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी वेळेचेही नियोजन करण्यात आले असून विसर्जनाची प्रक्रिया साधारणतः रात्री १० ते १२ वाजण्याच्या आत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मंडळांनी आपापल्या मिरवणुकीचे नियोजन वेळेचे भान ठेवून करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आवाजाची पातळी ओलांडू नये ,उत्सव जल्लोषात साजरा करावा, मात्र या जल्लोषाला कायद्याची आणि नियमांची मर्यादा असली पाहिजे, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
टिटवाळा पूर्व आणि पश्चिम भागातून यंदा साधारणतः ११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस स्टेशनकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मांडा परिसरातील सुमारे १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी टिटवाळा आणि मांडा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावतील, सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.जल्लोष असू द्या, मात्र नियमांच्या चौकटीत. उत्सव साजरा करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही आणि शांततेला कोणतीही बाधा येणार नाही, याची जबाबदारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन कल्याण तालुका पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिल्याने यंदाच्या गणेश विसर्जनावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
पोलिसांकडून विशेष बंदोबस्ताची तयारी
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांकडून संपूर्ण बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, बंदोबस्तावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना व ब्रीफिंग देण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणांसह मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.
टिटवाळा पूर्व, पश्चिम तसेच मांडा परिसरातील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची माहिती, त्यांचे लोकेशन आणि विसर्जनाचा नियोजित मार्ग पोलिसांकडून निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक मंडळाच्या संपर्कासाठी संबंधित समन्वयक पोलीस अंमलदाराची नियुक्ती करण्यात आली असून, मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गाने आणि ठरलेल्या वेळेतच विसर्जनासाठी जावे, तसेच मुख्य मिरवणुकीत सहभागी होताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
मिरवणुकीच्या मार्गावरील परिस्थितीची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केवळ मुख्य रस्त्यांवरच नव्हे, तर परिसरातील गल्ली आणि उपगल्लींमध्येही पोलिसांची उपस्थिती ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील ठरलेल्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी पुरेशा राखीव पोलीस फौजेची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांचाही समावेश आहे. राखीव फौजेसाठी आवश्यक संपर्क यंत्रणा आणि वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी गर्दीचे नियोजन, मिरवणुकीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून सर्व स्तरांवर तयारी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर; ध्वनीक्षेपक मापक पथकाकडून रीडिंगला सुरुवात
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड अनिल लाड यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीक्षेपक मापक पथकाने टिटवाळा परिसरात ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची रीडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनिमर्यादेचे पालन होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून मोजमाप केले जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्याची नोंद घेऊन नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याने गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत जल्लोषासोबत नियमांचेही भान ठेवण्याची जबाबदारी मंडळांवर राहणार आहे.














Leave a Reply