पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
टिटवाळा : अजय शेलार
अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होत असताना टिटवाळा, मांडा आणि परिसरात लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुका विविध विसर्जन स्थळांकडे रवाना झाल्या.
सकाळपासूनच टिटवाळ्यातील रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी लगबग पाहायला मिळत होती. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गुलालाची उधळण यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणरायाला निरोप देण्यासाठी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख मार्गांवर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आणि स्वयंसेवकांकडून समन्वयाने काम करण्यात आले. गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले.
दरम्यान, ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनीक्षेपक मापक पथकाने टिटवाळा परिसरातील विविध ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची रीडिंग घेण्यास सुरुवात केली. उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली.
गणरायाला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहासोबतच भावुकता आणि हुरहूरही जाणवत होती. गेल्या अनेक दिवसांपासून घराघरांत आणि गणेश मंडपांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करणाऱ्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ येताच अनेक भाविक भावुक झाले.
या भावनिक क्षणांच्या आठवणी जपण्यासाठी अनेक भाविकांनी मोबाईल कॅमेऱ्यात गणरायाची छबी टिपली. विसर्जन मिरवणुकीतील जल्लोष, ढोल-ताशांचा निनाद आणि बाप्पाच्या दर्शनाचे क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती.
विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. भक्ती, उत्साह आणि भावनेने भारलेल्या वातावरणात टिटवाळ्यातील यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.













Leave a Reply