टिटवळा : अजय शेलार
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात टिटवळ्यातील निमकर नाका परिसरात रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवाची यंदाची आरास लक्षवेधी ठरली आहे. धार्मिक कथानक, भव्य मूर्ती, रंगसंगती, प्रकाशयोजना आणि चलचित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या देखाव्यात मच्छिंद्रनाथ आणि महाकालीमातेच्या युद्धाचा देखावा यावेळी साकारण्यात आला आहे . सलग एक महिना मेहनत घेऊन साकारण्यात आलेला हा देखावा पाहण्यासाठी टिटवाळ्यात असंख्य भाविक रांग लावत आहेत .
मच्छिंद्रनाथांच्या कथानकासोबत महाकालिका मातेचे रौद्ररूप प्रभावीपणे उभे करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ गणेशमूर्तीचे दर्शन न घेता एका धार्मिक कथानकाचा दृश्य अनुभव घेता येत आहे.
कै. धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ रत्नाकर पाटील यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या २७ वर्षांपासून गणेशोत्सवाची ही परंपरा जपली जात आहे. दरवर्षी नव्या संकल्पनेतून आरास साकारण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत पाटील कुटुंबीयांनी धार्मिक विषयावर आधारित भव्य देखाव्याची निर्मिती केली आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी घेतलेली मेहनत आरासीतून स्पष्टपणे जाणवते.
यंदाच्या देखाव्याची सुरुवातच भाविकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सजावटीने होते. पुढे अष्टविनायकांच्या प्रतिमा, दत्तगुरू आणि नवनाथ परंपरेशी संबंधित मांडणी करत मुख्य कथानकाकडे भाविकांना नेण्यात आले आहे. विशाल माशाच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान केलेली गणेशमूर्ती ही या आरासीत विशेष आकर्षण ठरत आहे. माशाची रंगसंगती आणि त्याची केलेली हुबेहूब मांडणी पाहता हा प्रसंग प्रत्यक्ष दृश्यासारखा भासतो.

यानंतर आरासीत उभे राहते ते महाकालिका मातेचे भव्य आणि रौद्र स्वरूप. अनेक हातांमध्ये विविध अस्त्रे धारण केलेली देवी, पायाशी साकारलेले प्रसंग आणि आजूबाजूला उभारलेल्या पात्रांमुळे युद्धभूमीचा आभास निर्माण करण्यात आला आहे. महाकालिका मातेच्या रौद्र रूपाला प्रकाशयोजनेची साथ मिळाल्याने संपूर्ण देखाव्याला अधिक प्रभावी रूप प्राप्त झाले आहे.
देखाव्यातील राक्षसांची पात्रे, त्यांच्या हातातील अस्त्रे, वाद्य वाजवितानाचे प्रसंग आणि नृत्याच्या हालचालींची केलेली मांडणी यामुळे स्थिर मूर्तींच्या पलीकडे जाऊन जणू संपूर्ण कथानक डोळ्यांसमोर घडत असल्याचा अनुभव भाविकांना मिळतो. विशेष म्हणजे प्रत्येक पात्राची वेशभूषा, रंगरंगोटी आणि देहबोली याकडेही बारकाईने लक्ष देण्यात आले आहे.
गणेशमूर्तीपासून मुख्य कथानकापर्यंत आणि त्यानंतर महाकालिकेच्या भव्य रूपापर्यंत संपूर्ण आरासीत केलेली दृश्यांची सांगड यंदाच्या देखाव्याला वेगळेपण देते. धार्मिक श्रद्धेसोबत कल्पकता आणि कलाकुसरीचा वापर करून उभारलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांकडून उत्सुकता व्यक्त होत आहे.
रत्नाकर पाटील, यांचे संपूर्ण कुटुंब हे गणेशोत्सवाच्या आयोजनात सहभागी झाले आहेत. उत्सवकाळात भजन, हरिपाठ आणि आरतीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. २७ वर्षांची गणेशसेवेची परंपरा, दरवर्षी नवी संकल्पना आणि यंदाच्या आरासीत धार्मिक कथानकाला दिलेले भव्य दृश्यरूप, यामुळे रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवाने टिटवळ्यातील गणेशोत्सवाच्या आकर्षणात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील कुटुंबीयांनी केले आहे.













Leave a Reply