टिटवाळा-गोविली रोडवरील ओला कार प्रकरणात गूढता कायम…
सूत्रांकडून चालकाच्या हत्येचा संशय, अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा
टिटवाळा : टिटवाळा-गोविली रोड परिसरात काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत उभी आढळलेली ओला कंपनीची कार आता गूढ आणि चर्चेचा विषय ठरू लागली आहे. सुरुवातीला या घटनेमुळे परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहल वाढले होते. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काही विश्वसनीय गोपनीय सूत्रांकडून धक्कादायक माहिती समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सर्व बाबींवर टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलिस स्टेशनकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा-गोविली रोडवरील पेट्रोल पंप परिसरात उभी असलेली पांढऱ्या रंगाची ओला कार काही स्थानिकांच्या नजरेस पडली होती. वाहन बराच वेळ त्या ठिकाणी उभे असल्याचे दिसताच नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला. याच वेळी काही जणांनी या वाहनाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात विविध दावे आणि अफवा वेगाने पसरू लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत तपास सुरू केला होता.
दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुण्याच्या जुन्नरच्या हदीत एक एक मृतदेह सापडला असून या प्रकरणाचा संबंध एका ओला चालकाच्या संशयास्पद मृत्यूशी असू शकतो, अशी चर्चा तपास वर्तुळात सुरू असल्याचे समजते. संबंधित चालक हा मुंबईतील असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पैशांच्या वादातून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशयही सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच ही घटना नगर-पुणे हद्दीत घडली असावी आणि त्यानंतर संबंधित वाहन टिटवाळा परिसरात आणून सोडण्यात आले असावे, अशी शक्यताही सूत्रांकडून मांडली जात आहे.
मात्र या संदर्भात कल्याण तालुका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून विचारणा केली असता त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला असून तपास सुरू असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व तपशील अधिकृतरीत्या समोर येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दरम्यान, टिटवाळा-गोविली रोडवर आढळलेल्या या संशयास्पद कारमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर पसरलेल्या अपुष्ट माहितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी तपास यंत्रणांकडून अधिकृत खुलासा होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या विविध अंगांनी सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














Leave a Reply