पालघरमध्ये राजकीय भूकंप – माजी आमदार अमित घोडा यांचा भाजपाला रामराम, शिवसेनेत पुन्हा प्रवेश

Whatsapp image 2025 05 17 at 10.20.58 am (1)

पालघर : निलेश कासट

पालघर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत माजी आमदार अमित घोडा यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम केला असून, शिवसेना (शिंदे गट) मध्ये ‘जय महाराष्ट्र’ करत पुनरागमन केले आहे. ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात घोडा यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या अमिता घोडा, भाऊ दिलीप घोडा तसेच अनेक समर्थक व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमाला पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढण यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अमित घोडा हे सध्या ठाणे सहकारी बँकेचे संचालक आहेत. अनेक वर्षांनंतर त्यांची ही ‘घरवापसी’ भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाने तालुकानिहाय नवीन पदाधिकारी नेमले होते, परंतु त्यानंतर पक्षात अंतर्गत गटबाजी समोर आली होती. ग्रामीण भागात दोन गट तयार झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

या पार्श्वभूमीवर घोडा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा राजकीय फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) सध्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *