एमएमआरडीए, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केली तिसऱ्या टप्प्यातील रिंग रोडच्या कामाची पाहणी
कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार एमएमआरडीएचे अधिकारी यांनी महापालिकेचे भूसंपादन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्यासमवेत रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्यातील आरओडब्ल्यूसाठी पत्री पूल कचोरे ते कांचनगावपर्यंत सुरू असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या कामाची पाहणी केली. शुक्रवारपासून या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
एमएमआरडीए व महापालिका अधिकारी, ठेकेदार, स्थानिक पोलीस व महापालिका पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई चालू करण्यात आली आहे. यावेळी महापालिकेचे सहा आयुक्त भारत पवार, एमएमआरडीएचे व महापालिकेचे सर्वेअर देखील उपस्थित होते. या कारवाईमध्ये एमएमआरडीएला पायलिंग करण्यासाठी तसेच बॅरेकेटिंग करण्यासाठी तसेच जिओ टॅगिंग करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तेथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले व या प्रोजेक्ट बाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.
आता एमएमआरडीए मार्फत या परिसरातील जिओ टेक्निकल इन्वेस्टीगेशन व ट्री सर्वे कामास सुरुवात होणार आहे. यामुळे रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्यातील कामास गती मिळणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना कल्याण पत्रीपुल येथून माणकोली ब्रिजवरून ठाणे येथे अत्यंत कमी वेळात पोहोचता येणार आहे. पर्यायाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.














Leave a Reply