टिटवाळा : टिटवाळा येथील मांडा कोळीवाडा गावातून कोळी समाजाची पहिली MBBS डॉक्टर झालेल्या करिष्मा पाटील हिचे गावात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. कठीण परिस्थितीवर मात करत, करिष्माने Georgia American University येथून MBBS पदवी प्राप्त केली असून तिचे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
मांडा गावातील रहिवाशी असलेले विश्वनाथ पाटील यांची कन्या करिष्मा पाटील हिच्या पाठीशी संपूर्ण कुटुंबाने उभे राहत तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या करिष्माने अतिशय संघर्ष करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आजही आगरी-कोळी समाजात मुलींच्या उच्च शिक्षणाला तितकेसे प्राधान्य दिले जात नाही. अशा सामाजिक परिस्थितीत करिष्माने आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करत तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले.
तिच्या या यशाबद्दल साई आश्रय सेवा मंडळ, जय मल्हार मंडळ व ग्रामस्थ मंडळ मांडा तसेच मांडेकर ग्रुप यांच्या वतीने करिष्माचे ती अमेरिकेहून भारतातील आपल्या टिटवाळा येथील मांडा गावात येताच तिचे मोठ्या जल्लोषात बॅंड आणि फटाके वाजवून गावकऱ्यांनी तिचे जल्लोषात स्वागत करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.करिष्माचे हे यश नव्या पिढीतील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली.














Leave a Reply