सहाय्यक उपायुक्त प्रमोद पाटील यांचा दणका…विकासकाने माघार घेतली, अनधिकृत बांधकाम स्वतःच हटवले!

Whatsapp image 2025 03 21 at 3.04.29 pm

टिटवाळा : टिटवाळ्यातील प्रसिद्ध गणेश मंदिर रोड आणि तलाव परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) बाग व तलाव सुशोभिकरणासाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी बेहराम इराणी यांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने तक्रारीची गंभीर दखल घेत “अ” प्रभाग क्षेत्र सहाय्यक उपायुक्त प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई केली.

कल्याण तालुक्यातील टिटवाळा, सर्व्हे नं. १९०, हिस्सा नं. २ या ८५०० चौ. मीटर भूखंडावर हंसराज पटेल आणि भुमिक पटेल यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत अनधिकृत लोखंडी बांधकाम सुरू केले होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार विरोध केल्यानंतरही अतिक्रमण वाढत असल्याने बेहराम इराणी यांनी महापालिकेकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच प्रभाग क्षेत्र सहाय्यक उपायुक्त प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित विकासकाला तातडीने नोटीस बजावली. नोटीसमध्ये अनधिकृत बांधकाम त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले, अन्यथा महापालिका स्वतः कारवाई करून त्याचा संपूर्ण खर्च संबंधित विकासकाकडून वसूल करेल, असा इशारा देण्यात आला.

महापालिकेच्या ठाम भूमिकेमुळे कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी विकासकाने स्वतःच अनधिकृत बांधकाम हटवण्याचा निर्णय घेतला. जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम हटवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी ही कारवाई पाहून समाधान व्यक्त केले आणि प्रमोद पाटील व महापालिकेच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले.

महापालिकेच्या ठोस भूमिकेमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “जर अशाच प्रकारे महापालिकेने कठोर भूमिका घेतली, तर भविष्यात कोणीही सार्वजनिक किंवा आरक्षित जागांवर अतिक्रमण करणार नाही.” महापालिकेने राखीव भूखंडावर सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी जागा राखून ठेवली असून, भविष्यात येथे बाग, तलाव सुशोभिकरण आणि विविध नागरिकोपयोगी प्रकल्प राबवले जाऊ शकतात. त्यामुळे या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने अधिक दक्ष राहावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *