स्वामींच्या  पुण्यतिथीदिनी टिटवाळा येथील केंद्रात दरबार स्थापना कार्यक्रम संपन्न

Whatsapp image 2025 04 20 at 2.00.09 pm
टिटवाळा : टिटवाळा पश्चिम येथील श्री साई श्रद्धा अपार्टमेंट मांडा येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (डिंडोरी प्रणीत) यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा पावन उत्सव अत्यंत भक्तिभावाने आज दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी  संपन्न झाला. सेवेकरी आतुरतेने वाट बघत असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दरबाराची टिटवाळा पश्चिम येथे स्थापना सोहाळा देखील उत्साहात आणि स्वामीनामाचा गजर करत  स्वामींच्या प्रतीमेची प्राणप्रतिष्ठा करत पार पडला .

स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे प्रकट झालेले साक्षात दत्तावतार मानले जातात. त्यांनी संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी अर्पण केलं. त्यांचं “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य आज लाखो भक्तांसाठी आधार बनलं आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी होत गेली. वातावरणात मंत्रोच्चारांची गूंज, फुलांच्या सुवासाने दरबार सुशोभित झाला होता. लहान बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करून सुरेल आरती सादर केली. त्यानंतर श्री स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठा व दरबारातील फोटोंची विधीवत स्थापना पूजनासह करण्यात आली. पुढे श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ व हवनात्मक सेवा पार पडली. हवनाच्या ज्वाळेतून निर्माण होणारी ऊर्जात्मकता सर्व भक्तांच्या अंत:करणाला स्पर्शून गेली.

दुपारनंतर भक्तांनी अनुभव कथनाद्वारे श्री स्वामींच्या कृपाप्रसादाची साक्ष दिली. कोणी आजारातून बरे झाले, कोणी मानसिक त्रासातून मुक्ती मिळवली, तर काहींनी जीवनात अडलेल्या मार्गांना स्वामींच्या कृपेने दिशा मिळाल्याचे सांगितले. “स्वामींचं दरबार म्हणजे आमच्या घरात देवाचं अस्तित्व आहे” असे भावनिक उद्गार अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाले. सायंकाळी महानेवेद्य अर्पण करून आरतीने उत्सवाची सांगता करण्यात आली. शेकडो भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आशीर्वाद मागितले.

हा अखिल कार्यक्रम परमपूज्य गुरुमाउलींच्या कृपाशीर्वादाने अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. स्थानिक सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी मनापासून मेहनत घेऊन प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त करत, “पुन्हा अशा कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळो,” अशी प्रार्थना केली.

Whatsapp image 2025 04 20 at 2.00.09 pm (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *