“हर हर महादेव” च्या जयघोषात संपूर्ण टिटवाळा आणि परिसर शिवमय

Whatsapp Image 2025 02 26 At 3.07.52 Pm (1)

टिटवाळा : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त टिटवाळा आणि परिसरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या अलोट गर्दीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच मंदिरांच्या प्रांगणात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गंगा गोरजेश्वर देवस्थान, मढ येथे मध्यरात्री घडणाऱ्या अद्भुत घटनेचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. रात्री १२ वाजता येथे कारंजी प्रकट होऊन शिवलिंगावर अभिषेक घडतो, हे दृश्य पाहण्यासाठी हजारो शिवभक्त उत्सुक होते. महादेवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडीसह विविध भागांतून भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. काळू नदीच्या त्रिवेणी संगमात स्नान करून गोरजेश्वर महादेवाच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला. या पर्वाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे हरिपाठ, प्रवचने, भजन आणि कीर्तन यांची रेलचेल होती.

Whatsapp Image 2025 02 26 At 12.52.45 Pm

टिटवाळा पूर्वेकडील शिवमंदिर, वासुंद्री येथील पेशवेकालीन शिवमंदिर, मांडा पश्चिम येथील महाकालेश्वर मंदिर आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील नव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या शिवपिंडीस दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर गुहा मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली होती. हे केदारेश्वर गुहा मंदिर एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण आहे. हे शिवमंदिर एका मोठ्या गुहेत आहे आणि त्याच्या मध्यभागी एक विशाल शिवलिंग आहे. विशेष म्हणजे, हे शिवलिंग वर्षभर थंड पाण्यात बुडलेले असते. ही गुहा नैसर्गिकरीत्या तयार झालेली असून, पाण्याचा स्रोत कुठून येतो आणि इतक्या उंचीवरही वर्षभर कसे टिकते, हे आजही गूढ आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलयुग चार युगांचे प्रतिक असलेल्या चार खाबांचे हे मंदिर असून सध्या या चार खांबा पैकी केवळ एकच खांब उभा असुन तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी आख्यायिका या मंदिराची आहे. त्यामुळे या मंदिराची टिटवाळ्यात साकारलेली प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांच्या वतीने आलेल्या शिवभक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले.

Whatsapp Image 2025 02 26 At 3.07.50 Pm

वासुंद्री येथील पांडवकालीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त जत्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील या जत्रेला आसपासच्या गाव खेड्यातील ग्रामस्थांनी जत्रेला गर्दी केली होती. आलेल्या शिवभक्तांना उद्योजक विजय पाटील यांनी खिचडीचे वाटप केले . मांडा टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री गावच्या नदीकिनारी असलेल्या महाकाळेश्वर मंदिरातही शिवभक्तांचा महापूर पाहायला मिळाला. येथेही भक्तांना  प्रसादाचे वाटप करण्यात आले.  रिजन्सी परिसरात असलेल्या शिवमंदिरातही सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली होती . भाविकांनी दुग्धाभिषेक करून महादेवाची आराधना केली.  हर हर महादेवच्या जयघोषात टिटवाळा आणि परिसरातील महाशिवरात्री उत्सव उत्साहात पार पडला.महाशिवरात्रीच्या निमित्ताने वासुंद्री येथील पांडवकालीन शिवमंदिर परिसरात दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या जत्रेत यंदाही मोठी गर्दी झाली होती. गावकरी आणि आसपासच्या खेड्यांतील श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मांडा पश्चिम येथील महाकाळेश्वर मंदिरालाही शिवभक्तांनी फुलांनी भरून टाकले होते. रिजन्सी परिसरातील शिवमंदिरातही सुंदर सजावट करण्यात आली होती. भक्तांनी दुग्धाभिषेक करून महादेवाची आराधना केली. “हर हर महादेव” च्या जयघोषात संपूर्ण टिटवाळा आणि परिसर शिवमय झाला होता.

Whatsapp Image 2025 02 26 At 12.53.37 Pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *