‘वेदनांनी विव्हळलेला जीव वाचवण्यासाठी धावली माणुसकी’; मांडा-टिटवाळ्यात जखमी श्वानाला नवसंजीवनी

टिटवाळा  : अजय शेलार 

असह्य वेदनांनी तडफडणारा, डोक्यावर खोल जखम आणि त्यात पडलेले जंतू… तरीही कोणावर भुंकण्याचा वा आक्रमक होण्याचा प्रयत्न नाही; जणू डोळ्यांतूनच मदतीची याचना करणारा एक मुक जीव मांडा-टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील पंचवटी चौकाच्या पुढे असलेल्या श्री माऊली कृपा सोसायटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पडून होता. परिसरातील नागरिकांच्या नजरेस ही हृदयद्रावक अवस्था वारंवार येत होती; मात्र ठोस पावले उचलली गेली नव्हती. अखेर ‘जनता हीत फाउंडेशन’चे रितेश कांबळे आणि नियाज शेख यांच्या संवेदनशील नजरेत ही बाब भरली आणि त्यांनी वेळ न दवडता मानवतेचा हात पुढे केला.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी मांडा-टिटवाळा पश्चिम येथील महापालिकेच्या पशुवैद्य उपचार केंद्राशी तातडीने संपर्क साधला. संबंधित डॉक्टर सागर कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आर्यन मोहापे घटनास्थळी दाखल झाले. जखमी कुत्र्याची अवस्था गंभीर होती; डोक्यावरील जखमेत संसर्ग वाढला होता आणि वेदनांमुळे तो अशक्त झाला होता. मात्र तात्काळ केलेली मलमपट्टी, जंतुनाशक उपचार, आवश्यक इंजेक्शन व औषधोपचार यामुळे काही वेळातच त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. उपचारादरम्यान कुत्र्याने कोणताही आक्रमक प्रतिसाद न देता शांतपणे उपचार स्वीकारले, ही बाब उपस्थितांना अंतर्मुख करणारी ठरली. या संपूर्ण घटनेत सामाजिक बांधिलकी आणि शासकीय यंत्रणेची तत्परता यांचा समन्वय दिसून आला. रितेश कांबळे, निया शेख आणि पशुवैद्यकीय पथकाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मृत्युपंथाला लागलेला हा जीव नव्याने उभारी घेत असल्याचे स्पष्ट झाले. मुक्या प्राण्यांप्रती असलेली जबाबदारी केवळ दयेपुरती मर्यादित नसून ती कृतीतून सिद्ध करावी लागते, याचा प्रत्यय या घटनेने दिला आहे.

शहरी भागात वाढत्या बांधकामांमुळे आणि दुर्लक्षामुळे भटक्या प्राण्यांची दुरवस्था वारंवार समोर येते. अशा वेळी नागरिकांनी केवळ पाहणाऱ्याची भूमिका न घेता प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मांडा-टिटवाळ्यातील या घटनेने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा दिलासा दिला असला, तरी प्रत्येक जखमी, उपेक्षित जीवासाठी अशीच संवेदनशीलता जागी राहणे हीच खरी सामाजिक प्रगती ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *