ठाणे, . ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या ‘पसायदान विकास संस्था’ या निवासी संस्थेतून 29 बालकांची सुटका करत जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. संस्थेत अल्पवयीन मुलांना मारहाण आणि लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संस्थेचे संचालक बबन शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
10 एप्रिल रोजी ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर प्राप्त झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 11 एप्रिल रोजी पोलिसांच्या सहकार्याने संस्थेची पाहणी केली. पाहणीदरम्यान बालकांशी थेट संवाद साधून झालेल्या चौकशीत अत्याचार आणि मारहाणीची धक्कादायक माहिती समोर आली. तत्काळ पुढाकार घेत पोलिसांनी संस्थेतील 20 मुली आणि 9 मुलांची सुरक्षित सुटका केली.
सुटका करण्यात आलेल्या बालकांना तत्काळ बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना उल्हासनगर येथील विशेष बालगृह व शासकीय बालगृहात हलविण्यात आले आहे. या मुलांपैकी काहीजण स्थानिक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असून त्यांच्या परीक्षांच्या दृष्टीने विशेष शैक्षणिक व्यवस्था करण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय सुरू आहे.
या प्रकरणी संस्थेचे संचालक बबन शिंदे, त्यांच्या पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, सहाय्यक प्रकाश गुप्ता आणि दर्शना पंडित या पाच जणांवर बाल न्याय अधिनियम 2015 आणि ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले असून ते सर्व खडवली येथील रहिवासी आहेत.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बालकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन ‘झीरो टॉलरन्स’च्या भूमिकेवर ठाम आहे. अशा प्रकारच्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या परिसरात अशी अनधिकृत संस्था असल्यास किंवा बालकांवर कुठलाही अन्याय, शोषण होत असल्याची शंका आल्यास तात्काळ 1098 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. आपल्या सहकार्यामुळेच अशा गंभीर प्रकारांना वेळीच आळा घालता येईल.”














Leave a Reply