टिटवाळा (वार्ताहर) :

मुक्त पत्रकारितेवर थेट हल्ला करत एका स्थानिक पत्रकाराला मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करत “गॅंगरेपची खोटी बातमी का लावली?” असा जाब विचारण्यात आला. त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकाराची गंभीर नोंद घेत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पत्रकार राजू टपाल हे एका स्थानिक वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. दि. १० मे रोजी त्यांना सकाळी १२:०७ वाजता एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील इसमाने अत्यंत उद्धट आणि आक्रमक भाषेत पत्रकार टपाल यांच्यावर अश्लील शिव्यांचा वर्षाव करत त्यांना आणि त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली.
सुरुवातीला वाटलेली ही एक दडपशाहीची पद्धत असली, तरी पुढे चौकशीत समोर आले की धमकी देणारा इसम गॅंगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी शबनम शेख हिचा भाऊ जावेद असून तो सायनमधील जीटीबी नगर येथे वास्तव्यास आहे. तसेच शबनम सध्या त्याच्याकडे लपून बसल्याचीही माहिती मिळाली आहे. इतर आरोपींचे ठिकाणही पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम 351(4), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे — पत्रकारांची सुरक्षितता कुठे आहे?
स्वतःच्या जीवाला धोका पत्करून जनतेसमोर सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकवले जाणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. स्थानिक पत्रकार संघटनांनी याची गंभीर दखल घेतली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकारांचा आवाज दाबण्याचे हे प्रकार थांबवण्यासाठी सरकार आणि यंत्रणांनी ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. अन्यथा लोकशाहीचा चौथा स्तंभ खचून जाईल.













Leave a Reply