टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर आज अक्षरशः अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले आणि बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. फुटपाथ नागरिकांसाठी असतो की अतिक्रमणांसाठी, असा सवाल उपस्थित होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असून, पदचारी आणि प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न तीव्र झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवरही बोट ठेवले जात आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, टिटवाळा शहर यांच्या वतीने यांच्या ॲड. जितेंद्र जोशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सविस्तर निवेदन देत या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधण्यात आले आहे. महासंघाच्या मते, टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या आसपास मुख्य रस्ते आणि फुटपाथ अनधिकृत हातगाड्या व फेरीवाल्यांनी व्यापले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक मार्गांचा वापर करणे कठीण झाले आहे. पदचाऱ्यांना फुटपाथऐवजी मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो, वाहनांची रांग लागते आणि अपघाताचा धोका वाढतो. याशिवाय नो-पार्किंगमध्ये उभी राहणारी वाहने आणि रिक्षांची गर्दी यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महासंघाने विशेषतः लक्ष वेधले आहे की, महापालिकेकडून फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई होत असली तरी ती केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याचा आरोप नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहते आणि परिस्थिती पूर्ववत होते. या सगळ्याचा सर्वाधिक फटका रोजच्या प्रवासासाठी स्थानक परिसरात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि एखादा गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या समस्येचा मूळ गाभा म्हणजे नियोजित मंडईचा अभाव असल्याचे महासंघाने अधोरेखित केले आहे. अधिकृत जागेवर महापालिकेमार्फत मंडई उभारण्यात आल्यास फेरीवाले आणि हातगाड्या यांचे पुनर्वसन शक्य होईल आणि फुटपाथ मोकळे होतील, असा ठाम दावा करण्यात आला आहे. मंडईची स्थापना ही केवळ अतिक्रमण हटवण्याची उपाययोजना नसून शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी आवश्यक पाऊल ठरेल, असेही निवेदनात नमूद आहे. त्याचबरोबर अनधिकृत हातगाड्या व फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करून पदचाऱ्यांचा मूलभूत हक्क असलेला फुटपाथ वापर सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन केवळ तात्पुरती मोहीम न राबवता दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहर झपाट्याने वाढत असताना पायाभूत सुविधांचे नियोजन मागे पडले तर अशा समस्यांचे प्रमाण वाढतच जाणार, याची जाणीव प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे. टिटवाळा शहराच्या मध्यवर्ती भागातील हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा, शहरी शिस्तीचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. आता निर्णयाची वेळ आली असून, ठोस कृतीद्वारेच प्रशासन नागरिकांचा विश्वास संपादन करू शकते—अन्यथा फुटपाथवरील हा अतिक्रमणांचा विळखा शहराच्या नियोजनालाच प्रश्नचिन्ह लावत राहील.














Leave a Reply