जागतिक जल दिनानिमित्त कल्याणात ‘प्राचीन वारसा विहीर फेरी’; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पर्यावरण दक्षता मंडळाचा उपक्रम; विहिरींचा इतिहास, महत्त्व आणि संवर्धनाचे धडे


कल्याण : जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण दक्षता मंडळाने २२ मार्चच्या निमित्ताने २० मार्च २०२६ रोजी कल्याण येथे ‘प्राचीन वारसा विहीर फेरी’चे आयोजन केले. शहरातील ऐतिहासिक विहिरींचा अभ्यास, त्यांचे महत्त्व आणि पाणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या फेरीत गजानन विद्यालयातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत, प्रत्यक्ष पाहणीद्वारे जलसंपत्तीविषयी महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.

कल्याण शहराला विहिरींचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, आजही अनेक जुन्या विहिरी स्थानिक पाण्याच्या गरजा भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या फेरीचे मार्गदर्शन आदित्य कदम यांनी केले. गेल्या वर्षभरात त्यांनी कल्याणमधील विविध विहिरींचा सखोल अभ्यास केला असून, त्याच अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.फेरीची सुरुवात गजानन विद्यालयातून झाली आणि पारनाका परिसरापर्यंत एकूण सहा ऐतिहासिक विहिरींची पाहणी करण्यात आली. प्रत्येक विहिरीजवळ थांबत विद्यार्थ्यांना तिचा इतिहास, खोली, बांधकाम पद्धती, तसेच त्या परिसरातील जैवविविधता याबाबत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती देण्यात आली. याशिवाय विहिरी प्रदूषित होण्याची कारणे, भूजल पातळीतील घट आणि विहिरी आटण्यामागील घटक यांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विहिरींचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विहिरी पावसाचे पाणी साठवून ठेवतात, भूजल पातळी वाढवण्यास मदत करतात आणि पाणी टंचाईच्या काळात महत्त्वाचा आधार ठरतात, हे स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक जलस्रोत जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. या फेरीत एकूण २४ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारत विविध बाबी समजून घेतल्या. शाळेचे सचिव केदार पोंक्षे यांचीही या वेळी उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले. ही ‘प्राचीन वारसा विहीर फेरी’ विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि अनुभवसमृद्ध ठरली. पारंपरिक जलस्रोतांची ओळख आणि त्यांचे जतन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यास या उपक्रमाने हातभार लावला असून, भविष्यात अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *