झुनोटिक रोगांविरोधात ‘वन हेल्थ’चा संदेश; आंबिवलीत जागरूकता शिबिर, स्वच्छता किट वाटप

कल्याण : ग्रामीण भागातील पशुपालक व नागरिकांना झुनोटिक रोगांबाबत सजग करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढाकारातून आंबिवली येथे एकदिवसीय विशेष जागरूकता कार्यक्रम पार पडला. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) निधीतून राबविण्यात येणाऱ्या “वन हेल्थ” दृष्टिकोनावर आधारित ऑल इंडिया नेटवर्क प्रोजेक्ट अंतर्गत, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने १३ मार्च रोजी समता नगर येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात ४५ पशुपालक व शेतकरी सहभागी झाले असून, त्यापैकी २६ लाभार्थ्यांना स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त डॉ. दिपक कंधारे उपस्थित होते. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर कसबे व डॉ. प्रिती म्हात्रे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रामीण समुदायामध्ये झुनोटिक रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या रोगांचे लवकर निदान, प्रतिबंध आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. विलास वैद्य यांनी झुनोटिक रोगांच्या नियंत्रणावर सविस्तर भाष्य करताना वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित प्राणी हाताळणी आणि पर्यावरण स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. रेबीज, लेप्टोस्पायरोसिस, ब्रुसेलोसिस, क्षयरोग, अँथ्रॅक्स आणि सिस्टिसेरकोसिस यांसारखे रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये थेट संपर्क, दूषित पाणी व अन्न, तसेच प्राण्यांच्या स्रावांद्वारे पसरण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राण्यांच्या संपर्कानंतर साबणाने हात धुणे, हातमोजे व गमबूटचा वापर, जखमांची योग्य काळजी आणि आजारी प्राण्यांपासून दूर राहणे यांसारख्या उपायांनी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

सह-प्रमुख अन्वेषक डॉ. जगदीश गुडेवार यांनी ‘वन हेल्थ’ संकल्पनेवर प्रकाश टाकताना मानव, प्राणी आणि पर्यावरण या तिन्ही घटकांमधील परस्परसंबंध अधोरेखित केला. निरोगी प्राणी, स्वच्छ वातावरण आणि स्वच्छतापूर्ण मानवी सवयी यांच्या एकत्रित परिणामामुळे रोगांचा प्रसार रोखता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्राण्यांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट, पूर्णपणे शिजवलेले मांस व पाश्चराइज्ड दुधाचे सेवन, तसेच स्वच्छ निवाऱ्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमात पशुपालक, दूध विक्रेते, कसाई व ग्रामीण नागरिकांना झुनोटिक रोगांचा अधिक धोका असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे जागरूकता, वैयक्तिक स्वच्छता, संरक्षणात्मक साधनांचा वापर आणि वेळेवर पशुवैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचा संदेश देण्यात आला.

कल्याण तालुक्याचे सहायक पशुधन विकास अधिकारी श्री. सुरोषे व पशुधन पर्यवेक्षक यांनी शासनाच्या विविध पशुसंवर्धन योजनांची माहिती दिली. तसेच यंग प्रोफेशनल-II सुश्री वृषाली कदम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले तसेच पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सक्रिय सहभाग आणि सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून, झुनोटिक रोगांविषयी जागरूकता वाढविण्यासोबतच स्वच्छता व प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतींचे महत्त्व ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *