मुंबई, प्रतिनिधी (सतीश पाटील) : मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामुळे ठाणे खाडीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगतचा हा नाला मुलुंड शहरातील मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक व इतर घनकचरा थेट ठाणे खाडीत—जी ‘थाणे क्रीक फ्लेमिंगो सॅंक्च्युरी’ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘रामसर साइट’ म्हणून ओळखली जाते—नेऊन टाकत असल्याने तेथील कांदळवन, मासेमारीची प्रजनन स्थळे आणि एकूणच जैवविविधता धोक्यात आली आहे.
या गंभीर पर्यावरणीय समस्येबाबत 2024 मध्ये राष्ट्रीय हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना माननीय न्यायालयाने प्रशासनाला सुमारे 10 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले होते. या निधीतून मुलुंड ते विक्रोळी दरम्यान असलेल्या उघड्या नाल्यांवर विशेष जाळ्या (ट्रॅश बूम) बसवून प्लास्टिक व घनकचरा अडविण्याचे आदेश देण्यात आले होते, जेणेकरून हा कचरा थेट खाडीत जाण्यापासून रोखता येईल.
मात्र, प्रत्यक्षात सहा ठिकाणी जाळ्या बसविण्याचे नियोजन असताना आजपर्यंत केवळ दोनच ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात घनकचरा नाल्यामार्गे खाडीत मिसळत असून पर्यावरणीय हानी वाढत चालली आहे.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आलेला असताना नाले तुंबणे, पाण्याचा निचरा न होणे, परिसरात पाणी साचणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून उर्वरित ठिकाणी ट्रॅश बूम बसवावेत, तसेच दीर्घकालीन नियोजनाद्वारे नाल्यांमधील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ही माहिती पर्यावरणप्रेमी, समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी दिली असून, त्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे खाडीसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी आता ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात याचे दुष्परिणाम अधिक भीषण स्वरूपात समोर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
















Leave a Reply