महिला सक्षमीकरण, युवा विकास व शेती प्रश्नांवर निर्णायक चर्चा; महाराष्ट्रातून 100 पदाधिकारी सहभागी होणार
प्रतिनिधी, 29 मार्च :
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय महाअधिवेशन व महिला महाअधिवेशन येत्या 4 व 5 एप्रिल 2026 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील हजारो पदाधिकारी, प्रतिनिधी व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, कुर्मी समाजाच्या संघटनशक्तीचे मोठे प्रदर्शन यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.
या महाअधिवेशनाला केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांसारखे दिग्गज मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन होणार असून अधिवेशनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे.
कुर्मी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे हे अधिवेशन ठरणार असून पटेल, पाटील, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, देवेंद्र कुल वेल्लालर, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकार, अंजना समाज, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी अशा विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये समन्वय साधत एकसंघ शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून होणार आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात शेती व शेतकरी प्रश्न, युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, उद्योगधंद्यांच्या संधी तसेच समाजाची विविध क्षेत्रांतील भागीदारी वाढविणे या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. या चर्चांमधून विविध ठराव मंजूर करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिशा ठरवली जाणार आहे.
महाअधिवेशनात कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल. पी. पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वी. एस. निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच उद्योग महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातूनही या अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड, उद्योग महासभेचे प्रदेश अध्यक्ष समीर पाटील तसेच विद्यार्थी महासभेच्या प्रदेश अध्यक्षा कु. निकिता पाटील यांच्यासह राज्यातील तब्बल 100 पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पुरोहित महासभेचे कोकण प्रांताध्यक्ष विजय दलवी, कृषी महासभेचे विभागीय पदाधिकारी तसेच राज्य शासनाचे कृषिभूषण भगवान रामजी इंगोले यांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र कुर्मी समाजाचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस यावेळी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला केवळ संघटनात्मक नव्हे तर सामाजिक सन्मानाचेही महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकूणच, जबलपूरमध्ये होणारे हे राष्ट्रीय महाअधिवेशन कुर्मी समाजाच्या एकजुटीचे, नेतृत्वाच्या दिशादर्शनाचे आणि भविष्यकालीन धोरणांच्या आखणीचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, देशभरातील समाजबांधवांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.
















Leave a Reply