नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल

पिसवली भागात सर्वात बिकट परिस्थिती 
कल्याण: कल्याण डोंबिवली मध्ये अनेक भागात पाणी साचले होते .  पिसवलीमध्ये गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचले होते. केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना नागरीकांनी जाब विचारला. आमचे नुकसान कोण भरुन देणार? वारंवार सांगून देखील नालेसफाई झाली नाही. जे नाले बांधले ते चुकीचे बांधले. सांगून देखील काही कारवाई केली नाही, अशी तक्रार करत नागरीकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
कल्याण डोंबिवलीमध्ये गुरुवारी (२० जून) जोरदार पाऊस झाला. डोंबिवलीत सागर्ली परिसरात पाणी साचले. कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरातील श्री कॉलनी, ज्योर्तिलिंग कॉलनी, धनश्री कॉलनी मधील नागरीकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरीकांच्या घरातील गृहपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर त्यांच्या काही अधिकाऱ्यांसोबत पोहचल्या. मुंबरकर यांना पाहताच नागरीक भडकले. या परिसरात बांधलेले नाले हे चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत. नालेसफाई देखील व्यवस्थित झाली नसल्याचे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊन देखील लक्ष दिले नाही. मुंबरकर यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत घेराव घातला. मुंबरकर यांनी नालेसफाईचे खाबर अभियंत्यावर फोडले. स्थानिक माजी नगरसेवक मोरश्वर भोईर यांनी महापालिकेच्या चूकीमुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई महापालिकेने करावी अशी मागणी केली.
 आम्ही १५  वर्षांपासून या भागात राहतो. नाला चुकीचा बांधल्यानं पावसाचे पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार येथील स्थानिक सरिता पाटील यांनी केली. या संदर्भात एकाही लोकप्रतिनिधीने केडीएमसीला जाब विचारलेला नाही. आज ठिकठिकाणी नागरीकांना त्रास सहन करावा लागला. याची साधी विचारपूसही एकाही लोकप्रतिनिधींना केली नाही लोकसभा निवडणूकीत मतांसाठी घरोघरी जाणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
कल्याणमधील सखल भागात पाणी
गुरुवारी सकाळी कोसळलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागातील आडीवली गावातील गणेश चौक परिसरातील चाळी, दुकाने, इमारतीमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते जलमय झाल्यानं नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली . दुकाने , इमारतीमध्ये पाणी शिरल्याने काही ठिकाणी मोटर, पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न नागरिकाकडून सुरू होता. अडिवली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नाले आणि गटारांची कामे करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, पालिका प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *