राष्ट्रीय विद्युत सुरक्षा चर्चासत्र उत्साहात; ‘शून्य विद्युत अपघात’ हे पुढील वर्षाचे लक्ष्य – आयुक्त अभिनव गोयल

कल्याण : प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा चर्चासत्र मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी आचार्य अत्रे कॉन्फरन्स हॉल येथे उत्साहात पार पडले. महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.

विद्युत क्षेत्रातील सुरक्षितता, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील महानगरपालिकांचे विद्युत अभियंते, विद्युत कर्मचारी, विद्युत ठेकेदार तसेच त्यांच्या टीममधील कर्मचारी आणि महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी आयुक्त अभिनव गोयल यांनी विद्युत सुरक्षेबाबत बोलताना प्रत्येक कामासाठी आवश्यक असलेली चेकलिस्ट तयार करून ती काटेकोरपणे पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्येही जागरूकता निर्माण होणे आवश्यक असून या विषयाचा समावेश शिक्षणात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता या चर्चासत्रातून मिळालेल्या सूचना प्रत्यक्षात राबविणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पुढील वर्षासाठी “शून्य विद्युत अपघात” हे लक्ष्य ठेवून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

चर्चासत्रात विद्युत निरीक्षक राजेंद्र यादव यांनी ‘इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी कायदेशीर चौकट आणि विद्युत निरीक्षकाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. सहाय्यक विद्युत निरीक्षक अर्जुन जाधव यांनी ‘विद्युत अपघात व आग लागण्याची कारणे तसेच सुरक्षा उपाय’ या विषयावर माहिती दिली, तर शाखा अभियंता भूपण मानकोटे यांनी ‘इलेक्ट्रिकल जॉब सेफ्टी अ‍ॅनालिसिस’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांची विशेष उपस्थिती होती. चर्चासत्राच्या आयोजनासाठी अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत) जितेंद्र शिंदे तसेच उपअभियंता (विद्युत) भागवत पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

या चर्चासत्रामुळे विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती होऊन भविष्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *