टिटवाळा : प्रतिनिधी
टिटवाळा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोहने सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर बिघाडानंतर आता जावईपाडा ट्रान्सफॉर्मरवरील एलटी पोल तुटल्यामुळे जावईपाडा, बालाजी नगर, वारगडे नगर आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार रुंदे फळेगाव रोडवरील जावईपाडा ट्रान्सफॉर्मरवरील एलटी पोल अचानक तुटल्यामुळे जावईपाडा , बालाजी नगर, वारगडे नगर व परिसरातील सर्व संबंधित भागातील वीजपुरवठा तातडीने बंद ठेवावा लागला. सध्या तांत्रिक पथकाकडून तुटलेला पोल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होण्यास सायंकाळपर्यंत वेळ लागू शकतो, अशी माहिती मांडा ग्रामीण शाखेच्या सहायक अभियंत्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या आधीही काल मोहने येथील 100 केव्ही सबस्टेशनमध्ये बसविण्यात आलेला 50 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अचानक ट्रिप झाल्याने टिटवाळा पूर्व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या बिघाडाचा परिणाम फिडर क्रमांक 1 तसेच इतर 22 केव्ही वीजवाहिन्यांवर झाला होता. अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे टिटवाळा पूर्व भागातील अनेक वसाहती काही काळ अंधारात होत्या.
मोहने सबस्टेशनमध्ये तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी त्यानंतर लगेचच जावईपाडा परिसरात एलटी पोल तुटल्याने पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सलग दोन दिवस वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती वापर, दुकाने, लहान उद्योग तसेच दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जावईपाडा, बालाजी नगर, वारगडे नगर आणि परिसरातील नागरिकांनी वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली असून अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या बिघाडांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महावितरणच्या तांत्रिक पथकाकडून सध्या पोल उभारणीचे काम सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.














Leave a Reply