मुंबई डेटलाईन 24 : विलास बारहाते मानवत, परभणी
परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी २ मार्च रोजी शाळेला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.
या भेटीदरम्यान शाळेच्या वतीने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत शाळेची माहिती अतिशय प्रभावीपणे सादर केली. विद्यार्थ्यांची आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण पाहून पालकमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे तसेच शिक्षकांच्या परिश्रमाचे मनापासून कौतुक केले.
शाळेच्या प्रगतीमध्ये शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत पालकमंत्री बोर्डीकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. शाळेतील शैक्षणिक वातावरण, स्वच्छता आणि व्यवस्थापन याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास बारहाते यांनी शाळेसाठी दोन मजली सुसज्ज इमारतीची मागणी केली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि शाळेच्या वाढत्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही इमारत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यात मानवतची ही शाळा राज्यात प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले.

















Leave a Reply