रिंगरोडच्या रखडलेल्या कामावर संताप, बाधितांसाठी निर्भय महाराष्ट्र पक्षाचा एल्गार

Whatsapp Image 2025 02 23 At 7.15.25 Pm

टिटवाळा: टिटवाळा परिसरात रिंगरोडच्या कामाच्या संथ गतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या कामामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांना अद्याप पुनर्वसनाची कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. यावर त्वरित उपाययोजना करावी तसेच रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. निर्भय महाराष्ट्र पक्षाचे संदीप नाईक, राजेंद्र जाधव, आनंद कोन्हे, दिलीप मालोकर, चरणदास गरुड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.

काम रखडण्याचे कारण आणि प्रशासनाचे स्पष्टीकरण

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) रिंगरोडचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामामुळे अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले आहे, मात्र त्यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.

यावर उत्तर देताना सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले की, “रिंगरोडच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत विलंब झाला होता. निवडणुकीमुळे ही प्रक्रिया रखडली होती, मात्र आता ती अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. तसेच जे नागरिक बाधित झाले आहेत, त्यांनी आपल्या पुनर्वसनासंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा विषय तातडीने पाठवू आणि मालमत्ता विभागाशी समन्वय साधून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.”

निर्भय महाराष्ट्र पक्षाचा इशारा

या चर्चेनंतर निर्भय महाराष्ट्र पक्षाचे संदीप नाईक यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, “रिंगरोडचे काम रखडल्यामुळे स्थानिक रहिवासी मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. अनेक कुटुंबे बेघर झाली असून, त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. आम्ही यापूर्वीही अनेकदा या प्रश्नाबाबत आवाज उठवला आहे. मात्र, जर प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्हाला अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.”

सदर मोर्चामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर दबाव वाढला असून, आता या प्रकरणावर किती लवकर निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *