किशोरभाई शुक्लांकडून स्वखर्चाने रस्त्यालगत स्वच्छता आणि वृक्षारोपण; इंदिरानगर परिसरात पर्यावरण जागृतीचा नवा आदर्श

Whatsapp image 2025 07 18 at 12.06.12 pm (2)

टिटवाळा, प्रतिनिधी 
राजकीय पदावर असूनही सामाजिक भान जपणाऱ्या नेत्यांची शहराला नेहमीच गरज असते, आणि अशा जबाबदार नेतृत्वाचे उदाहरण म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक किशोरभाई शुक्ला. शुक्ला यांनी स्वखर्चाने कल्याण पूर्वेतील इंदिरानगर नांदप रोडच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम पार पाडला. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेसोबतच हरित वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती वाढताना दिसून येत आहे.

या मोहिमेमुळे केवळ सौंदर्यवाढ नाही, तर भविष्यासाठी निसर्गाचे जतन करण्याचा एक चांगला संदेश समाजात जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.  वाढते प्रदूषण, धूळधक्कड आणि सांडपाण्याच्या समस्यांमुळे शहरवासी त्रस्त असताना, किशोरभाई शुक्लांनी हाती घेतलेली ही संकल्पना एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे. या उपक्रमावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ‘अ’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आरोग्य निरीक्षक मोहनीश गडे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अक्षय कराळे तसेच महापालिकेचे कर्मचारी सहभागी होते. शिवसेना शाखाप्रमुख संतोष पवार, पदाधिकारी ज्ञानेश्वर मढवी, शनि अंभोरे, शिवमोलन यांच्यासह स्थानिक पत्रकारांनीही प्रत्यक्ष हजेरी लावली. या उपक्रमाच्या निमित्ताने किशोरभाई शुक्लांनी ‘मुलभूत गरजा आणि सामाजिक जबाबदारी’ यांची सांगड घालत एक अनुकरणीय उदाहरण समाजापुढे मांडले आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर लोकप्रतिनिधींनीही यापासून प्रेरणा घ्यावी आणि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *