कॅन्सरविरोधातील जनजागृतीसाठी टिटवाळ्यात मॅरेथॉन यशस्वी; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Whatsapp Image 2025 01 05 At 2.17.25 Pm (2)

टिटवाळा, ५ जानेवारी: कॅन्सरविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘रन फॉर फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ मॅरेथॉन आज टिटवाळ्यात उत्साहात पार पडली. रेड स्वस्तिक सोसायटी, स्पर्श फाउंडेशन, स्पंदन फाउंडेशन, आणि आनंद होम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात टिटवाळा आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महागणपती मंदिराच्या प्रांगणातून सकाळी ६ वाजता या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी कल्याण तहसीलदार सचिन शेजल यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महागणपती मंदिरात विशेष पूजा व आरती झाली. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.मॅरेथॉनमध्ये ५ किमी आणि ३ किमी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात तरुण वर्गाचा उत्साह विशेषतः लक्षवेधी ठरला.

Whatsapp Image 2025 01 05 At 2.01.04 Pm

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कॅन्सरविरोधातील लढ्यात सामूहिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. “कॅन्सरविरोधातील लढा हा केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सहभागी झाले पाहिजे. आरोग्यासाठी जागरूकता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग या दोन गोष्टी समाजाचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.

Whatsapp Image 2025 01 05 At 2.05.42 Pm (3)

या कार्यक्रमामुळे केवळ कॅन्सरविरोधी जनजागृतीच झाली नाही, तर आरोग्यासंबंधी जागरूकतेचा आणि सामाजिक एकजुटीचा संदेशही लोकांपर्यंत पोहोचला. कार्यक्रमादरम्यान प्रमोद नांदगावकर यांनीही लोकांना संबोधित करत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले. टिटवाळ्यातील गणपती मंदिर परिसर आज सामाजिक चेतनेने भारावला होता. कॅन्सरविरोधातील या मॅरेथॉनने आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले असून, हा उपक्रम नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

Whatsapp Image 2025 01 05 At 4.14.48 Pm

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *