पत्रकार संजय कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने उल्हासनदीत जलपर्णी हटवण्याचे काम सुरू!
कल्याण (प्रतिनिधी):
कल्याण तालुक्यातील उल्हास नदीचे वाढते प्रदूषण आणि नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाढलेली जलपर्णी ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना त्रासदायक ठरत होती. या गंभीर विषयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील निर्भीड आणि जबाबदार पत्रकार संजय कांबळे यांनी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियामधून सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या या सामाजिक भान आणि पत्रकारितेतील चिकाटीला अखेर यश लाभले आहे.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषदेचे डॅशिंग, कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सर यांनी तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः नदीपात्राची पाहणी केली आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. आज अखेरीस जलपर्णी काढणारे मशीन नदीत उतरवून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, उल्हास नदीला जलपर्णीमुक्त मोकळा श्वास मिळू लागला आहे. या उपक्रमामुळे नदीतील जैवविविधता, विशेषतः मासे आणि इतर जलचरांचे जीवन सुरक्षित होणार आहे. त्याचप्रमाणे परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासनातील अनेक मान्यवर अधिकारी – जिल्हाधिकारी, सीईओ, डेप्युटी सीईओ, कल्याण तहसीलदार, गटविकास अधिकारी संजय भोये, म्हारळ, वरप, कांबा येथील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, आणि ग्रामस्थ – यांनी योगदान दिले. पण या साऱ्या हालचालींमागे पत्रकार संजय कांबळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, लोकहिताची तळमळ, आणि निसर्गाविषयीची आस्था हेच मुख्य प्रेरणास्त्रोत ठरले. घुगे सरांनी पत्रकार संजय कांबळे यांना त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन, त्यांच्याशी जलपर्णी विषयावर चर्चा केली होती. ही चर्चा केवळ औपचारिक नव्हती – तर तिचे फलित आज संपूर्ण तालुका अनुभवत आहे.
आज हा आनंदाचा, प्रेरणादायी क्षण सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे साकार झाला असला, तरी संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या लढ्यानेच या कार्याची दिशा ठरवली. त्यामुळे संपूर्ण तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रशासनासह पत्रकार संजय कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. उल्हास नदी लवकरच जलपर्णीमुक्त होऊन, पुन्हा एकदा निसर्गाशी नाते जपणारी जीवनदायिनी बनेल, अशी सर्वांना आशा आहे.













Leave a Reply