कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या आयुष्यांची तगमग… एक अंत पाहणारी व्यथा

Whatsapp image 2025 05 02 at 5.49.47 pm

कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

टिटवाळा, अजय शेलार :

आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य माणूस स्वप्नं उराशी बाळगून कर्ज घेतो, पण कर्जफेडीचा ताण जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातो, तेव्हा तो माणूस कोसळतो. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक जबाबदाऱ्या आणि आत्मसन्मान यांच्या कचाट्यात सापडलेली माणसं अनेकदा आत्मघातकी निर्णय घेतात. ही एक वैयक्तिक नाही, तर सामाजिक शोकांतिका आहे. कल्याण तालुक्यातील मांडा-टिटवाळा परिसरातील रिजेन्सी सर्वम या गृहनिर्माण संकुलात एक हृदयद्रावक घटना घडली असून, कर्जबाजारीपणाच्या मानसिक ताणाला कंटाळून मल्हारी बारकु ठाकरे (वय ३८) या युवकाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना १ मे रोजी रात्री उघडकीस आली.

मल्हारी ठाकरे हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह राहते होते. त्यांचे सख्खे भाऊ माणिक ठाकरे त्याच संकुलात राहतात. माणिक ठाकरे हे आपल्या कुटुंबासह मूळगावी उत्तरकार्याला गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी मल्हारी यांची पत्नी व मुलगीही लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या होत्या.संध्याकाळपासून मोबाईलवर संपर्क होऊ न शकल्याने शंका आल्याने माणिक ठाकरे यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या घरी पाहायला सांगितले. जेव्हा पत्नी माधुरी ठाकरे यांनी दुसऱ्या चावीनं दार उघडलं तेव्हा त्यांनी बेडरूममध्ये पाहिलं, की मल्हारी यांनी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मल्हारी यांना खाली उतरवले असता, ते अचेतन अवस्थेत आढळले. वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.माणिक ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मल्हारी हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते आणि कर्जफेडीच्या चिंतेत त्यांची झोपही उडाली होती. आर्थिक अडचणी ही कोणाच्याही जीवनात येऊ शकतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी संवाद, मदत आणि धैर्य हीच खरी शस्त्रं आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींशी मन मोकळं करा, मदतीची हातभार घ्या आणि सकारात्मक पर्याय शोधा. जीवनात कोणतीही अडचण ही अंतिम नसते. आत्महत्या ही पर्याय नाही, ती केवळ दुःखांची साखळी पुढे नेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *