टिटवाळ्यात तीन दिवसांपासून माणूस रस्त्यावर, पोलिसांचा थंड प्रतिसाद!

Whatsapp image 2025 06 01 at 7.24.09 pm
टिटवाळा : टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला असलेल्या पार्किंग परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक इसम निपचित  रस्त्यावरच पडलेला आहे. त्याची अवस्था अत्यंत बिकट असून, तो व्यक्ती जागेवरून हलू शकत नाही, तरीही त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. या इसमाविषयी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पोलिसांना माहिती दिली, मात्र तिथून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नाही. स्थानकातील पोलिसांचा संपर्क क्रमांक सतत बंद असल्यामुळे नागरिकांनी दुसरे पर्याय शोधले, मात्र तरीही मदतीची वाट पाहत असलेली ती व्यक्ती आज तिसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी आहे.

112 या आपत्कालीन क्रमांकावर देखील नागरिकांनी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानंतर संबंधित पोलीस स्थानकातून मुस्तफा शेख हा पोलीस कर्मचारी म्हणाला की, घटनास्थळी 112 मार्फत पाठवलेल्या पथकाने पाहणी केली आहे. पण त्यानंतरही प्रत्यक्षात काहीही कार्यवाही झाली नसल्याचे स्थानिकांनी पुन्हा कळवले. पोलीस कर्मचारी यांना दुसऱ्यांदा फोन करून विचारणा केल्यावर, त्यांनी “ती व्यक्ती नशेत आहे” असे म्हणून विषय झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र या इसमाजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, ही व्यक्ती फक्त नशेत नसून तिच्या पायाला जबर मार लागलेला आहे, त्यामुळे तिला हलता येत नाही, हे समोर आले. त्याचबरोबर तिने स्वतः सांगितले की ती भायखळा परिसरातील आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, जर ही व्यक्ती आजारी, जखमी व मदतीसाठी असमर्थ अवस्थेत असेल आणि त्याकडे प्रशासन व पोलिसांनी दुर्लक्ष केले तर याची जबाबदारी कोण घेणार?

सार्वजनिक ठिकाणी पडलेली व्यक्ती जर नशेत असल्याचं गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, तर ही समाजातील विकृती आहे. पोलिसांचं हे वर्तन केवळ निष्काळजीपणाचं नव्हे, तर अमानवीपणाचं उदाहरण ठरत आहे. मागील काही काळात कल्याण तालुक्यात एमडी ड्रग्स प्रकरणांत वाढ झालेली आहे, त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक संशयास्पद घटनेची गंभीरतेने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ही घटना एक सिग्नल आहे — एक माणूस रस्त्यावर तीन दिवस बेवारस पडून आहे, जखमी आहे, काहीही करू शकत नाही आणि तरीही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत जर उद्या काही अनुचित घडलं, किंवा त्या व्यक्तीचा जीव गेला, तर त्याचा दोष कोण घेणार? प्रशासनाने वेळेत पावलं उचलली नाही, तर आपण फक्त बातम्या वाचणारे, पाहणारे आणि निष्क्रिय समाज बनून राहू. ही परिस्थिती केवळ एका व्यक्तीची वेदना नाही, ही समाजाची सामूहिक असंवेदनशीलता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *