कल्याण मम्मीज ग्रुपने दिला अनोखा संदेश

कल्याण : कुणाल म्हात्रे 

कल्याण मम्मीज ग्रुप तर्फे वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिननिमित्त कल्याण पश्चिमेतील गांधारी रोड येथील ऋतु कॉम्प्लेक्स मधील आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यात विशेष करून वडाचे झाड लावण्यात आले. वडाच्या झाडा सोबत काही इतर रोपे ही लावण्यात आली. घरी फांदी तोडून आणून त्याची पूजा करणे आपण टाळून एक छोटंसं रोप आपल्या आवारात लावले तर खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी होऊन पर्यावरण संवर्धनातही आपण हातभार लावू शकतो हा या उपक्रमाचा मुख्य हेतु होता.

      हे वृक्षारोपण करत असताना आजू बाजूच्या रहिवाशांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना जास्तीत जास्त उपभोग कसा घेता येईल या विचाराने झाडे लावण्यात आली. यात वडासोबत जास्तीत जास्त सावली देणारे बदामाचे झाड, चाफ्याचे झाड, गुलमोहोर अशी विविध प्रकारची रोपं लावण्यात आली. विशेष म्हणजे या रोपांची काळजी घेण्याचा मानस आणि जबाबदारी देखील ग्रुप सदस्यांनी उचलली आहे.

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण मम्मीज ग्रुप तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात वृक्षारोपणा सोबतच काही ठराविक कॉटन कॅरी बॅग्सचे वाटप जवळपासच्या छोट्या भाजी विक्रेत्यांना करत आहेत. जेणेकरून रोजच्या भाजीपाला खरेदीसाठी प्लास्टिक कॅरीबॅग वापरणे बंद करून कॉटनच्या किंवा रियूसेबल बॅग्स सोबत आणण्याची सवय अमलात आणून पर्यावरणाचा ऱ्हास कमीत कमी कसा होईल याबाबतची खबरदारी घेऊ शकतो.

तसेच या महिना अखेरीस लहान मुलांकरिता एक इंटरॅक्टिव्ह चर्चासत्र योजिले आहे. या सत्राचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरण संवर्धनात मुलेही त्यांचा हातभार अनेक पद्धतीने लावू शकतात आणि ही जबाबदारी कशा पद्धतीने उचलू शकतात याबाबत त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करणे असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *