“सितारे जमीन पर” चित्रपट शोने दिव्यांग मुलांच्या मनात फुलवले आनंदाचे रंग — स्पर्श फाउंडेशन, रेड स्वस्तिक सोसायटी आणि अनामिका फाउंडेशनचा आगळावेगळा उपक्रम समाजात उमटवतो सकारात्मक स्पंदन

Whatsapp image 2025 07 14 at 10.37.32 am (1)

टिटवाळा — समाजातील बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या जीवनात उमेद, आनंद आणि आत्मविश्वासाचे क्षण फुलवण्यासाठी स्पर्श फाउंडेशन, रेड स्वस्तिक सोसायटी आणि अनामिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक भावस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपट शो नुकताच कल्याण (पश्चिम) येथील सर्वोदया मॉलमधील मूवी मॅक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. या वेळी विशेष मुलांसाठी आमिर खान अभिनीत ‘सितारे जमीन पर’ या हृदयस्पर्शी चित्रपटाचा खास शो सादर करण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलांमध्ये सुप्त कलागुणांना वाव मिळवून देणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि समाजात त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा, असा होता. या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्पर्श फाउंडेशनचे प्रमुख डॉ. पुष्पराज स्वामी, रेड स्वस्तिक सोसायटी – भारत चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रमोद नांदगावकर आणि अनामिका फाउंडेशनचे विजय जोहरे यांनी पुढाकार घेतला.

चित्रपटादरम्यान विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हसू, डोळ्यातील तेज आणि त्यांच्यासोबत उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावरचे समाधान, या सर्वांनी या उपक्रमाचे खरे यश अधोरेखित केले. हे केवळ एक चित्रपट प्रदर्शन नव्हते, तर या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेरणेचे आणि सामर्थ्याचे रंग भरणारे क्षण होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूव्ही मॅक्स थिएटर, कल्याणच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय स्पर्श फाउंडेशन, रेड स्वस्तिक सोसायटी व अनामिका फाउंडेशनचे समर्पित कार्यकर्ते कमलेश बोनावटे, लखन जगताप, अमर धनावडे, प्रशांत खजुरे आणि मुकुंद नावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम फक्त एक मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता, समाजात दिव्यांगांसाठी समतेची जाणीव आणि सहवासाची जाणीव निर्माण करणारा ठरला. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, आणि विशेष मुलांच्या जीवनात उमेद आणि प्रेरणेचे इंद्रधनुष्य फुलवले जाईल, हीच या सुंदर उपक्रमामागील खरी भावना होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *