टिटवाळा, प्रतिनिधी –
“एक कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियान” अंतर्गत नुकतेच जैवविविधता उद्यान, एनआरसी प्लॉन्ट, आंबिवली (पूर्व) येथे ठाणे झोनतर्फे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी हिरवी शपथ घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सूक्त व भूसूक्त पठणाद्वारे वृक्ष व सीडबॉल पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये केडीएमसीचे उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, अधिकारी प्रसाद वाळुंज, माळी अनंता पाटील, पर्यावरण दक्षता मंडळाचे देवेश जाधव, एनआरसीचे सुरक्षा प्रमुख विजय चौधरी व स्वयंसेवी संस्था ‘अनुलोम’चे सुशांत शेलार यांचा समावेश होता.
वृक्षारोपणासाठी आंबा, जांभूळ, कडुलिंब, वड, पिंपळ, साग, नारळ, औदुंबर अशा स्थानिक व औषधी झाडांची निवड करण्यात आली होती. बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीडबॉल्स सुद्धा जमिनीवर टाकण्यात आले. ठाणे झोनमधील अंबरनाथ, डोंबिवली, टिटवाळा, कल्याण येथून आलेल्या १८ सेवा केंद्रांचे सेवेकरी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, कार्यक्रमात सामुदायिक आरती झाली आणि “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “वृक्षारोपण एक दिवसाची क्रिया नसून ती सातत्याने केलेली निसर्गपूजा आहे.”
कार्यक्रमानंतर सर्व सेवेकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. पर्यावरण विभागाच्या कविता माने, जिल्हा प्रतिनिधी योगिता पाटील, सिद्धेश बंड, प्रसाद पोटे, विनोद चव्हाण, श्वेता मोरे, सीमा अहिरे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमाचे नेतृत्व रुपेश रासने यांनी केले. ही हरित सेवा परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली













Leave a Reply