चुकीच्या मानसिकतेमुळे निधी परत – आमदारांचा खुलासा
टिटवाळा : अजय शेलार
‘विकासाचे वादळ’ म्हणून ओळखले जाणारे आमदार किसन कथोरे यांच्या मतदारसंघात एक गाव असेही आहे जिथं मृतदेह नेण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. कल्याण तालुक्यातील म्हसकळ या गावात काल मृतदेह स्मशानभूमीकडे नेताना चिखल, दगडधोंडे आणि पाण्यातून वाट काढावी लागल्याचे दृश्य सोशल मीडियावर झळकताच जनतेच्या भावना उफाळून आल्या.
गावकरी मृतदेह उचलत, घसरत आणि चिखलात पाय रुतवत स्मशानभूमी गाठताना दिसले. या दुर्दशेने म्हसकळच्या मागासलेपणावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला. स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ उलटूनही अशी अवस्था पाहून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
रस्ता बंद – खाजगी भिंतीमुळे अडथळा
पूर्वी गावदांड रस्ता वापरात होता, पण मनीषा सरक या खाजगी व्यक्तीने जमिनीवर वॉल कंपाउंड बांधल्याने तो रस्ता बंद झाला. या मार्गाने जलजीवन मिशनच्या पाइपलाइनचे कामही झाले होते, पण आता तेही बंद पडलं आहे. तात्पुरत्या मार्गासाठी मनोहर भोईर यांनी मदत केली असली तरी तो रस्ता अत्यंत कच्चा, अपुरे आणि धोकादायक आहे. पावसाळ्यात तर त्या मार्गाने चालणेच अशक्य होते.
प्रशासन गप्प, ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच
गावकऱ्यांनी सर्व प्रशासन यंत्रणांकडे तक्रारी केल्या पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. अतिक्रमणाविरोधात आदेश असूनही ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. “आम्ही सन्मानाने अंत्यसंस्कार करू शकत नसलो, तर विकासाच्या घोषणा आम्हाला नको” अशी भावना गावात व्यक्त होत आहे. आमदार कथोरे यांच्या नावावर विकासपुरुष, कार्यसम्राट अशी बिरुदं असली तरी त्यांच्याच मतदारसंघातील या गावात ही स्थिती का? असा रोष वाढत आहे. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांत ग्रामस्थ मतपेटीतून आपला राग व्यक्त करतील, हे निश्चित दिसून येत आहे. “रस्ता हवा, वचनं नकोत” अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन ठिय्या आंदोलन वा उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. गावात एकमताने या प्रश्नावर ठाम पावलं उचलण्याची तयारी सुरू आहे.
आमदारांचा खुलासा – चुकीच्या मानसिकतेमुळे निधी परत
या प्रकरणाबाबत विचारले असता आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, काही नागरिकांनी चुकीच्या मानसिकतेने सहकार्य न केल्याने दोन वेळा जनसुविधा योजेनेच्या माध्यमातून आलेला २० लाखांचा निधी परत गेला. शासकीय जागेवरही बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचे ते म्हणाले. “जमीन उपलब्ध झाली तर रस्ता तत्काळ पूर्ण करू” अशी ग्वाही त्यांनी दिली. तर याबाबत तहसीलदार सचिन शेजळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा विषय नव्याने समोर आला असून सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल.













Leave a Reply