कल्याण, दि. 28 ऑगस्ट : संतोष निरभवणे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (K.D.M.C.) परिवहन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे मोहोने परिसरातील नागरिक आणि प्रवासी वर्ग संतप्त झाला आहे. कल्याण ते मोहोने कॉलनीदरम्यान चालणारी बस सेवा अनेक वर्षांपासून सुरु असून, या मार्गावर चाकरमानी, मजूर वर्ग तसेच महिला विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मात्र अलीकडच्या काळात या सेवेची दैन्यावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आज गुरुवारी (दि. 28 ऑगस्ट 2025) सायंकाळच्या वेळी मोठ्या आकाराची बस मोहोनेच्या मुख्य रस्त्यावरच बंद पडली. एवढेच नव्हे तर, आणखी दोन बसेस कॉलनी परिसरातच बंद पडल्याने संपूर्ण वाहतूक कोलमडली. कल्याणकडे जाणारी व तेथून परतणारी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. परिणामी विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला व सामान्य प्रवाशांना रस्त्यात उभे राहून दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
या मार्गावर हजारो प्रवासी दररोज KDMC च्या बस सेवेवर अवलंबून असताना, मोहोनेकरांसाठी भंगार व नादुरुस्त बसेस का सोडल्या जात आहेत, असा संतप्त सवाल नागरिक व प्रवासी मंडळींनी उपस्थित केला आहे. “इतर मार्गांवर चांगल्या स्थितीतील बसेस धावताना दिसतात; मग मोहोनेकरांना दुय्यम का मानले जाते?” असा प्रश्न चर्चेत आहे.
नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, परिवहन विभागाने तातडीने लक्ष घालून सुस्थितीत व सुरक्षित बसेस मोहोनेकरांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा लवकरच अधिकाऱ्यांना जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.













Leave a Reply