टिटवाळ्यात कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन; गणेशभक्तांचा सन्मान करून अनोखा उपक्रम यशस्वी

Img 20250907 wa0012
टिटवाळा  : मांडा-टिटवाळा विभागात शिवसेनेच्या प्रयत्नातून व मिश्रा कुटुंबीयांच्या सहकार्याने तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात यंदा गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन अतिशय भक्तिभावाने केले. पर्यावरणपूरक पद्धतीने जलप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या कृत्रिम तलावात दीड दिवसांपासून ते अकरा दिवसांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व गणेशभक्तांनी जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण संरक्षणात हातभार लावत हा समाजहिताचा उपक्रम यशस्वी करून दाखवला. कृत्रिम तलावाचा लाभ घेतलेल्या गणेश भक्तांचे शिवसेनेतर्फे विशेष कौतुक करण्यात आले. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळाल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
शहरात दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नद्यांमध्ये व तलावांमध्ये मूर्ती विसर्जनामुळे निर्माण होणारे जलप्रदूषण ही गंभीर समस्या आहे. या समस्येवर पर्यावरणपूरक तोडगा म्हणून उभारलेला कृत्रिम तलाव हा यंदा गणेशोत्सवात उपयुक्त ठरला. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
या प्रसंगी बोलताना शिवसेना उप-शहरप्रमुख विजय (भाऊ) मारुती देशेकर यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनाही चालना देणारा सण आहे. नागरिकांनी जबाबदारीने कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरण रक्षणाची कळकळ दाखवली आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार.” या उपक्रमामुळे मांडा-टिटवाळा विभागात पर्यावरणपूरक सणाची जाणीव दृढ होत असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात नागरिक या उपक्रमाशी जोडले जातील, असा विश्वास स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *